जातेगाव घाटात रस्तालूट करणारी टोळी जेरबंद

एक पसार, पाच जणांकडून मुद्देमाल जप्त, सुपा पोलिसांची कामगिरी
जातेगाव घाटात रस्तालूट करणारी टोळी जेरबंद

सुपा |वार्ताहर| Supa

नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा टोलनाक्यासह जातेगाव घाटात गाड्या अडवून प्रवाशांना लुटणारी सराईत टोळी जेरबंद करण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे.

शुक्रवारी (दि. 25) 4 वाजता रस्ता लूट प्रकरणी तपास चालू असताना जातेगाव घाटात न्यू बब्बी दा पंजाबी ढाबा येथे पुण्याच्या दिशेने जात असताना महामार्गावर दोन मोटारसायकली त्यापैकी होंडा शाईन कंपनीच्या मोटारसायकलवर तीन इसम व हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या मोटारसायकलवर तीन इसम बसलेले आढळून आले.

हे सुपा पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या वर्णनाशी मिळते-जुळते असल्याने व त्यांच्यावर संशय बळाविल्याने पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, पोलीस काँ. ठोंबरे, पोलीस हेड काँ. पटेल व पोलीस हेड काँ. खैरे यांनी त्यांची चौकशी सुरू केली असता नयन राजेंद्र तांदळे (वय 26, रा. भिस्तबाग चौक, नगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेला आढळून आला.

मागच्या खिशात तीन हजार रुपये व अक्षय तात्याराम चखाले नावाचे आधार कार्ड मिळून आले. दुसर्‍या इसमास विठ्ठल भाऊराव साळवे (रा. झापवाडी, ता. नेवासा) असे सांगितले. अक्षय बाबासाहेब ठोबरे (रा. सावेडी) यांच्या खिशात मिरची पावडर मिळून आली. त्याच्याजवळ होंडा शाइन कंपनीची काळ्या रंगाची गाडी क्रमांक एम. एच-16 बी.ए. 5640 आहे. चौकशी सुरू असताना स्प्लेंडरवर बसलेल्या तीन पैकी एक इसम अंधाराचा फायदा पसार झाला.

दुसरी मोटारसायकल क्र.एम.एच. 16 ए.यू. 3174 वरील शाहूल अशोक पवार (वय 31), अमोल छगन पोटे (वय 28, दोघे रा. सुपा, ता. पारनेर) यांच्याही खिशात मिरची पावडरची पूड आढळून आली. त्यातील शाहुल पवार याची अंगझडतीमध्ये एक सुरा आढळून आला. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान पथकामध्ये उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, पो.हे. कॉन्स्टेबल खैरे, पटेल, पोलिस ना. खंडेराव शिंदे, अमोल धामणे, पो.काँ. यशवंत ठोंबरे, होमगार्ड टकले, अतुल रोकडे या पथकाने पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले. पुढील तपास पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे हे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com