जातप, त्रिंबकपूर शिवारात बिबट्यांचा संचार

शेतकरी, विद्यार्थी व महिला भयभीत
file photo
file photo

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील जातप, त्रिंबकपूर परिसरामध्ये गेल्या महिनाभरापासून पाच ते सहा बिबट्यांचा गावात, लोकवस्तीमध्ये, वाड्यावस्त्यांवर, रात्री व दिवसा संचार वाढल्याने काही शेतकर्‍यांना दिवसा दर्शन देत असल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने या भागात त्वरित पिंजरा लावण्याची मागणी जातप, त्रिंबकपूर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. त्रिंबकपूर येथे कुंडलिक कोळसे यांच्या दोन शेळ्या तर सोपान शेळके यांची एक शेळी बिबट्याने रात्रीच्या वेळी फस्त केली. तर दोन शेळ्या जखमी केल्या. दिलीप कणसे यांच्या घरी शिवेवरील (कोळसेवस्ती जवळ) सुमारे आठ दिवसापासून बिबट्या येत आहे. काल दुपारी त्यांच्या पत्नी व सून स्वतःच्या शेतात गवत घेत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली.

परंतु त्यांनी धीर धरत आरडा ओरडा केल्याने बिबट्या पळाला व सुदैवाने त्या बालंबाल बचावल्या. परंतु जाताना बिबट्याने त्यांचे पाळीव कुत्रे घेऊन धूम ठोकली. बिबट्याला विठ्ठल कोळसे व शांताराम राऊत, योगेश कोळसे यांनी लाख- टाकळीमिया रोडवर राऊत वस्ती जवळ तर दिलीप कणसे यांच्या पत्नी व सून यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात तर काही शेतकर्‍यांनी त्रिंबकपूर शिवेवरील म्हसोबा मंदिराजवळ अजित आढाव यांच्या वस्तीलगत डीपीजवळील उसाच्या शेतात तर काही शेतकर्‍यांनी त्रिंबकपूर जातप रस्त्यावरील ओढ्याजवळील बंडू आढाव यांच्या शेतात प्रत्यक्ष बघितला आहे.

या बिबट्याच्या दहशतीमुळे आपल्या शेतात शेतकरी व मजूर महिला काम करण्यास तर शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत आहेत. बिबटे गावात मानवी वस्तीत शिरल्याने मानवावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. बिबट्याबरोबर दोन पिल्ले असल्याचेही काही शेतकर्‍यांनी सांगितले. बिबटे रात्री व दिवसा कधीही दिसत असल्याने शालेय विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ चांगलेच धास्तावले असून बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत.

त्यामुळे या भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने काही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या भागात दोन-तीन ठिकाणी त्वरित पिंजरा लावण्याची मागणी जातप, त्रिंबकपूरच्या सरपंच सोनाली आढाव, उपसरपंच विलासराव कोळसे, आदींसह त्रिंबकपूर परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com