जातप येथील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाची प्रकृती गंभीर

जिल्हा रुग्णालयात चुकीचे उपचार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
जातप येथील बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी मुलाची प्रकृती गंभीर

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Devalali Pravara

बिबट्याच्या प्राणघातक हल्यात गंभीर जखमी झालेला राहुरी तालुक्यातील जातप येथील गरीब शेतकरी कुटुंबातील शालेय विद्यार्थी मयूर बोंबले याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने चुकीच्या पध्दतीने उपचार केल्याने मयूर याची प्रकृती गंभीर झाल्याचा आरोप मयूरच्या नातेवाईकांनी केला असून त्याला तातडीने नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांना सांगितले असता त्यांनी मदत करायची सोडून उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत. मयूरच्या जिवीतास काही झाल्यास त्यास वनविभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संपतराव जाधव यांनी दिला आहे.

मयूर याला उपचारासाठी वनविभागाच्या सांगण्यावरून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमेवर टाके घातले, मात्र दोनच दिवसांत टाके पिकले व मानेला आणि तोंडाला मोठ्या प्रमणावर सूज आल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच अंगात भयंकर ताप भरल्याने त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करुन पिकलेले टाके काढून जखमा स्वच्छ केल्यानंतर या मुलाचा ताप उतरला असला तरी अजून धोका टळलेला नसल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत राहुरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचरणे यांना कळविले असता त्यांनी वनविभागामार्फत जखमीला तातडीने आर्थिक मदत देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईक संतप्त झाले असून मयुरच्या जिवाला काही झाल्यास वनविभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल असे मुलाच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी सांगितले.

वनप्राण्याने मनुष्यप्राण्यावर हल्ला केल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची व संबंधित वन अधिकार्‍यांची असते. परंतु बिबट्या जेरबंद केल्यानंतर आपली जबाबदारी संपली असल्याच्या अविर्भावात राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाचरणे हे दिसत आहेत. त्यामुळे ते जखमी मरणाच्या दारात असताना देखील जखमीला मदत करण्याऐवजी अकलेचे तारे तोडत आहेत.

घटनेच्या दिवशी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन जखमी मुलाचा वैद्यकीय खर्च करण्याचे निर्देश वन अधिकार्‍यांना दिले असताना देखील त्यांच्या निर्देशाला हरताळ फासला आहे. जखमी मुलाच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने वनविभागाने तातडीने उपचारासाठी मदत करावी तसेच सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन संपतराव जाधव यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com