अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील सूत्रधार बाळ बोठेच्या पूर्वी दररोज संपर्कात असणार्यांची नावे पोलिसांनी शोधून काढली आहेत.

संपर्कातील ‘त्या’ व्यक्तींचे जबाब पोलिसांनी नोंदविल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कायद्याच्या कसोटीत टिकेल असा फरारीचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत न्यायालयात सादर केला जाणार असल्याची माहिती समजते.

तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी दिवसभर रेखा जरे यांच्या हत्याकांडापूर्वी बोठेच्या दररोज संपर्कात असणार्यांची कसून चौकशी केली. त्यातील काही लोकांचे जबाबही नोंदविण्यात आल्याचे समजते. फरार असलेल्या बोठेबाबत पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. तसेच त्याचा ठावठिकाणा कोठे असेल याचीही चाचपणी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. फरार असलेल्या बोठेचा मागमूस शोधण्याचा प्रयत्न म्हणून ही चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

30 नोव्हेंबरला जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली. अटकेतील आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसारच बाळ बोठे हाच हत्याकांडाचा सूत्रधार असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले. त्यानुसार बाळ बोठेला आरोपी करण्यात आले.

आरोपीच्या यादीत नाव येताच बोठे नगरमधून पसार झाला आहे. त्याचा जामीन अर्जही नामंजूर करण्यात आला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पाच पथके तैनात आहेत. दरम्यान, त्याला फरारी घोषित करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. कायद्याच्या कसोटीत टिकेल असा फरारीचा प्रस्ताव पोलीस तयार करत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत तो न्यायालयात सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हनी ट्रॅप संदर्भातही चौकशी

बोठे याने लिहिलेल्या हनी ट्रॅपच्या बातम्यांचा स्त्रोतही पोलीस शोधत आहेत. त्यासंदर्भात पोलिसांनी काही सहकार्यांकडे चौकशी केल्याचे समजते. हनी ट्रॅप आणि हत्याकांडाचा काही संबंध आहे का? याचा शोध पोलिसांकडून अजूनही सुरूच आहे. त्यासदंर्भातील पुरावे पोलिसांकडून जमा केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केलेल्या संपर्कातील एकाचे आरोपी सागर भिंगारदिवेसोबतचे काही कॉल झाल्याची चर्चा आहे. तसेच नगरमधून हवाल्यामार्फत बोठेला पैसे पुरविल्याची आवई शहरात पसरली आहे.