अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, त्याला मदत करणारे, त्याच्या संपर्कात कोणी आहे का? याचा पोलीस शोध घेत असून अशा लोकांची पोलीस चौकशी करत आहेत. त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला जातेगाव घाटात हत्या झाली. यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पाच आरोपींना अटक केले. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून बोठे याने जरे यांची सुपारी देऊन हत्या घडून आणली असल्याची माहिती समोर आली.

जरे यांची हत्या झाल्यानंतर दोन दिवस शहरात असलेला बोठे नियोजनपूर्वक पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके कार्यरत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्ह्यासह, पुणे व नाशिक जिल्ह्यात त्याचा शोध घेतला. नाशिक येथे बोठे याने पोलिसांना चकवा दिला. त्याला नगरमधून पळून जाण्यात मदत करणारे, त्याच्या संपर्कात कोणी आहे का? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी तांत्रिक पातळीवर तपास केला जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून बोठे याचा शोध सुरू असला तरी तो मिळून येत नसल्याने पोलीस हतबल झाले आहे.

बोठे याला शहरासह जिल्ह्यातील काही व्यक्तींनी मदत केली आहे. मदत करत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली आहे. अशा लोकांवर पोलिसांची नजर असून काही व्यक्तींची पोलिसांनी चौकशी देखील केली असल्याची माहिती समजते. बोठे याला मदत करणारे अनेकजण शहर सोडून गेले आहे.

अनेकांचे मोबाईल देखील बंद असल्याने पोलीस यासाठी तांत्रिक तपासाची मदत घेत आहे. यामुळे बोठे याला मदत करणार्या व्यक्ती सध्या पोलिसांच्या रडारवर आहे. दरम्यान, बोठे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

भिंगारदिवे, पवार, चोळकेचा कोठडीतील मुक्काम वाढला

दोघांना आज न्यायालयात हजर करणार

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात अटक असलेले आरोपी सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार, आदित्य चोळके यांना 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्याने त्यांना तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दुपारी पारनेर न्यायालयात हजर केले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बाठ बोठे हा पसार असून त्याचा शोध घेणे बाकी आहे.

अटक आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी सुरू असून अधिक तपास करणे बाकी असल्याने त्यांना पोलीस कोठडी मिळाली अशी मागणी तपासी अधिकारी पाटील यांनी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने पाटील यांची विनंती मान्य करत तिघांच्या पोलीस कोठडीत 11 डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात अटक असलेल्या फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तपासकामी त्यांना पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे अधिकार तपासी अधिकार्यांना आहे. त्यामुळे तपासी अधिकारी काय मागणी करतात याकडे लक्ष लागून आहे.