अहमदनगर|Ahmedagar

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी, १४ डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

आरोपी बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांचे दुपारपर्यंत म्हणणे आले नव्हते. ते म्हणणे दुपारी येईल. त्यावर अभ्यास करायला वेळ लागेल, असे म्हणणे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मांडले आणि सोमवारी सुनावणी ठेवण्याची विनंती केली.

जिल्हा न्यायाधीश नातू यांनी ती मान्य केली आहे. त्यामुळे बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे. यामुळे बोठे याच्या समोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत.

भिंगारदिवे, चोळके, पवारला न्यायालयीन कोठडी

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके, ऋषिकेश पवार यांना शुक्रवारी पारनेर न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

रेखा जरे यांची जातेगाव घाटात हत्या झाल्यानंतर या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा फरार आहे. आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे हे सध्या पोलीस कोठडीत आहे. सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके व ऋषिकेश पवार यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मीडिया ट्रायल करू नका न्यायालयाची माध्यमांना तंबी

रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाची मीडिया ट्रायल करू नये. या घटनेमध्ये आपण थिल्लरपणा सहन करणार नाही. प्रसारमाध्यमांनी संयमाने वार्तांकन करावे. तसेच, सुनावणीदरम्यान किंवा पोलीस तपासात माध्यमांकडून वार्तांकन करताना संयम सुटल्याचे निदर्शनास आल्यास थेट कारवाई करू, असा इशारा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दिला.

जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर सुनावणी होती. यावेळी न्यायाधीश नातू यांनी जरे हत्याकांड प्रकरणी होणार्या वार्तांकनाबाबत नाराजी व्यक्त केली. विश्वासार्हपद्धतीने वार्तांकन करावे. या घटनेच्या सुनावणीदरम्यान किंवा पोलीस तपासामध्ये माध्यमांचे वार्तांकन चुकीचे आढळल्यास कारवाई करू, असेही जिल्हा न्यायाधीश नातू म्हणाले. दरम्यान, आरोपी बोठे याचे वकील महेश तवले यांनी सोशल मिडीयावर काही समाजसेवक या प्रकरणाविषयी चुकीच्या पोस्ट शेअर करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर अशा पोस्टची प्रिंट तत्काळ जमा करा, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.