श्रीरामपुरात कडक निर्बंधासह जनता कर्फ्यु पाळावा; पालकमंत्र्यांचे आवाहन

'श्रीरामपूरात लवकरच ऑक्सीजन प्लँट उभा राहणार'
श्रीरामपुरात कडक निर्बंधासह जनता कर्फ्यु पाळावा; पालकमंत्र्यांचे आवाहन

श्रीरामपूर | प्रतिनिधी

करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गेली तीन चार महिने गाफील राहिलो. बेजबाबदारपणे वागल्यामुळेच करोनाची दुसरी लाट घातक ठरत आहे. ही साखळी तोडायची असल्यास स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे. पालिकेने जनता कर्फ्यु सक्तीने राबवावा. आताच आपण जबाबदारीने वागलो तर जुलै ऑगस्टमध्ये येणारी करोनाची तिसरी लाट घातक ठरणार नाही. त्यामुळे नागरिकांनीच गर्दी टाळून घरीच थांबाही साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. श्रीरामपुरात लवकरच ऑक्सीजन प्लँट उभा राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ श्रीरामपूर दौर्‍यावर आले असता विश्रामगृहावर अधिकारी, पदाधिकार्‍यांबरोबर करोबाबतचा आढावा घेतला. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे, नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अविनाश आदिक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ना. मुश्रीफ म्हणाले, या करोनाच्या काळात ऑक्सीजन व रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर येथे ऑक्सीजन प्लँटची उभारणी केली जाणार आहे. श्रीरामपूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन प्लॅट उभारला जाणार आहे. तसेच शिर्डी येथे लवकरच 2000 बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु होणार आहे. यात 200 बेड, व्हेंटीलेटर आयसीयु सुविधा, 1000 बेड ऑक्सीजन सुविधा असणार आहे. या रुग्णालयामुळे सहा तालुक्यातील रुग्णांची मोठी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे नगरला उपचारासाठी जाणारे कमी होवून शिर्डी उपचार घेवू शकतील.

तसेच श्रीरामपूर येथील म्हाडामध्ये करोना रुग्णाच्या उपचारासाठी कोविड रुग्णालय उभारणार असेल तर त्याला लगेच परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार म्हाडामध्ये 32 बेड ऑक्सीजन, 2 व्हेंटीलेटर आणि 68 साधे बेड असलेले हनुमान ट्रस्टचे कोविड रुग्णालय उभे राहणार असल्यामुळे श्रीरामपूरकरांची मोठी गैरसोय दूर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नगरपालिकेने पुढाकार घेवून जनता कर्फ्यु राबवावा, पालिका हद्दीतील अधिकार नगराध्यक्षांना असल्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा त्यांना पोलीस व महसूल प्रशासन सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com