नगरच्या ‘जनकल्याण’च्या रक्त संकलनावर बंदी

नाशिकच्या सहआयुक्त भामरे यांचे आदेश
नगरच्या ‘जनकल्याण’च्या रक्त संकलनावर बंदी

नाशिक |प्रतिनिधी| Nashik

नगरच्या जुन्या आणि मोठे नाव लौकिक असणार्‍या जनकल्याण रक्तपेढीला रक्त संकलनाचे काम बंद ठेवण्याचे आदेश नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दु.मो. भामरे यांनी दिले आहेत. अन्न, औषध प्रशासन विभागाचे नगरचे निरीक्षक ज्ञा.मो. दरंदले यांनी 12 नोव्हेंबरला रक्तपेढीच्या केलेल्या तपासणीच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असल्याचे अन्न, औषध प्रशासन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

अन्न औषध विभागाचे नगरचे निरीक्षक दरंदले यांनी नालेगावातील जनकल्याण रक्तपेढीची तपासणी केली होती. त्यात रक्तपेढी तांत्रिक कामकाजात गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या रक्तपेढीतील कर्मचारी हे खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असल्याचे तपासणीत समोर आले होते. याबाबत नगरचे निरीक्षक दरंदले यांनी नाशिक अन्न, औषध विभागाला सविस्तर अहवाल पाठविला होता. या अहवालात रक्तपेढीला तीन ते चार डॉक्टरांनी स्वतंत्रपणे त्यांचे म्हणणे विभागाला कळविलेले आहे.

त्यामुळे रक्तपेढीत पूर्णवेळ तांत्रिक व्यक्ती कार्यरत नसल्याचे अन्न, औषधाच्या निदर्शनास आले होते. तर काही डॉक्टर हे सुट्टी घेवून बाहेर खाजगी ठिकाणी काम करत असल्याचे, तसेच बाह्य रक्त संकलनात पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आलेले आहे. यामुळे अन्न, औषध प्रशासनाने जनकल्याण या नगरमधील जुन्या विश्वासू रक्तपेढीचे रक्तसंकलनाचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरमधील नालेगावात सुरू असणारी जनकल्याण रक्तपेढी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने चालविण्यात येते. गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळ ही रक्तपिढी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने सुरू होती. यामुळे जनकल्याणवर झालेल्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. भविष्यात ही रक्तपेढी त्रुटी दूर करून पुन्हा नव्या जोमाने सुरू होणार का याकडे नगरकरांचे लक्ष राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com