शासनाच्या धनगर आरक्षण समितीवर उपोषणकर्ते असमाधानी

आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
शासनाच्या धनगर आरक्षण समितीवर उपोषणकर्ते असमाधानी

जामखेड (तालुका प्रतिनिधी)

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित करून पहिले पाऊल पुढे टाकले या बद्दल धन्यवाद. परंतु समिती म्हणजे धनगर समाजाचे समाधान नाही. असे सांगत प्रत्यक्ष अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व चौंडी येथील उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर स्मारक स्थळी शुक्रवार (दि. 24) पासून यशवंत सेनेने उपोषण सुरू केले आहे. दरम्यान काल (सोमवारी) दुपारी आमदार राम शिंदे यांनी उपोषकर्त्यांची भेट घेऊन राज्य शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने इतर राज्यांमधील धनगर समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केल्याचे सांगत याबाबतच्या शासन निर्णयाची प्रत उपोषणकर्त्यांना दिली.

याबद्दल उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचे तसेच आ. शिंदे यांचे आभार मानले. यावेळी बोलताना यशवंत सेनेचे अध्यक्ष दोडतले म्हणाले, शासनाने अभ्यासासाठी समिती गठित केली म्हणजे धनगर समाजाचे समाधान झालेले नाही. प्रत्यक्ष धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा अध्यादेश लागू होईल तेव्हाच आमचे समाधान आहे. तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी दोडतले यांच्यासह माणिकराव दांगडे पाटील, प्रा. आण्णासाहेब रूपनवर, नितीन धायगुडे, किरण घालपे, बाळा गायके, दत्ता काळे, स्वप्नील मेमाणे, अक्षय शिंदे, कृष्णा बोबडे हे उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com