जामखेड | तालुका प्रतिनिधी
जामखेड पोलीस स्टेशनच्या (Jamkhed Police Station) आवारात वर्षानुवर्षे धुळखात पडलेल्या तसेच ठाण्याच्या सुशोभिकरणास बाधा ठरत असलेल्या बेवारस वाहनाच्या मुळ मालकाचा शोध लावण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
गंगामाता वाहन शोध संस्था पथक परंदवाडी ता. मावळ जि. पुणे यांच्या मदतीने तब्बल ८२ बेवारस वाहने मुळ मालकाच्या स्वाधीन केले जाणार आहेत. जामखेड पोलीस व गंगामाता वाहन शोध पथकाने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक होत आहे. शिवाय गुदमरलेल्या पोलीस ठाण्याचा परिसर अनेक वर्षानंतर मोकळा श्वास घेणार आहे.
पोलिसांनी अनेक गुन्हयातील प्रकरणात जप्त केलेली, अपघातातील वाहने, न्यायालयीन प्रक्रिया तसेच वाहन मालकाची उदासिनता यामुळे आपले वाहन घेऊन जाण्यास बहुतांश वाहन मालक टाळाटाळ व कंटाळा करीत असतात. अशी वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात वर्षानुवर्षे बेवारस म्हणुन धुळखात पडून असतात. परिणामी पोलीस ठाण्याच्या परिसराच्या सुशोभिकरणास बाधा निर्माण होते. पोलीस ठाण्याला बकालपणा प्राप्त होतो. ही बाब लक्षात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी अशा बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार अशा बेवारस वाहनांच्या मुळ मालकांची युध्द पातळीवर शोध मोहिम करण्यात आली. वाहनांच्या चेशी व इंजिन नंबरवरुन मुळ मालकाची यादी तयार करण्यात आली आणि केवळ दोनच दिवसात ८२ मुळ वाहन मालकांचा शोध जामखेड पोलीसांनी लावला.
अनेक वाहने अद्याप पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. लवकरच अशा वाहनांच्या मुळ मालकांचा देखील शोध लावण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उप निरीक्षक राजु थोरात, अनिल भारती, कारकून स.फौ. परमेश्वर गायकवाड, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे व सर्व टीम यांनी ही शोध मोहिम राबविली आहे.
शोध लागलेल्या वाहन मालकांचे नाव व पत्ता, वाहनाचा नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चेशी नंबर व इंजिन नंबर याची यादी जामखेड पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली आहे. सदर यादीमध्ये आपले नाव असल्यास अशा वाहन मालकांनी स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र तसेच आवश्यक ती कागदपत्रे दाखवून आपले वाहन १५ दिवसांच्या आत घेऊन जायचे आहे. अन्यतः अशी वाहने बेवारस समजून सरकारी प्रक्रिया पुर्ण करुन लिलाव करण्यात येणार असल्याचे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले आहे.