जामखेडला कचरा ठेकेदाराकडून बोगस बिलाद्वारे 70 लाखांची उचल

नगर परिषदेच्या अधिकार्‍यांची मिलीभगत ?
जामखेड नगरपरिषद
जामखेड नगरपरिषद

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड नगरपरिषद हद्दीतील घनकचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या एजन्सीने बोगस देयके सादर करून तीन महिन्यांत 70 लाखांचे बील उचलले. 210 जनावरांचा मृत्यू झाल्याच्या खोट्या नोंदी दाखवून त्यांचेही बील उचलण्याचा पराक्रम माहिती अधिकारात उघड झाला आहे. या प्रकारात नगरपरिषदेच्या संबंधित विभागातील अधिकार्‍यांचाही हात असल्याची चर्चा आहे.

शहरात घन कचरा उचलण्यासाठी वंशिका एन्टरप्रायजेस एजन्सीला ठेका दिला आहे. या ठेकेदाराने खूप मोठ्या प्रमाणात बोगस नोंद रजिस्टर बनवले असून जनतेचा पैसा कचरा उचलण्याचे बील म्हणून मोठ्या रकमा नगरपरिषदेकडून एजन्सीने वसूल केल्या आहेत. वंशिका एन्टरप्रायजेस एजन्सीने बनवलेल्या नोंद रजिस्टरची व उचललेल्या बिलाची चौकशी करावी तसेच पुढील बीले थांबवावे यासाठी जिल्हाधिकारी यांना नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीसह निवेदन दिले आहे.

सदर एजन्सीने दर महिन्याला अंदाजे 70 मृत जनावरांची वाहतूक केल्याची नोंद आहे. नगरपरिषद हद्दीत एवढे जनावरं दर महिन्याला मरत नाहीत. दर महिन्याला एजन्सीने नमूद केल्याप्रमाणे जनावरे मृत्यू झालेली नाहीत. मृत जनावरांची विल्हेवाट कशी लावली? कोठे लावली? याबद्दल नगरपरिषदेकडे कोणतीही लिखित स्वरूपात माहिती नाही. त्याचीही बिले सदर एजन्सीने उचलली आहेत.शहरातील मुतारी व शौचालय सीट संख्या चुकीची नोंदविली आहे. फॉगींग मशीनद्वारे दर महिन्याला कधीच फवारणी झालेली नाही.

तरीही एजन्सीला त्याची बिले अदा केली आहेत. लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झालेले आहे. तरी सदर भ्रष्टाचारी एजन्सीचे थकीत बीलं चौकशी पूर्ण केल्याशिवाय देऊ नयते. नगरपरिषद हद्दीतील जनतेचा पैसा आहे. घनकचरा डेपो मध्ये किती टन कचरा जमा आहे व खत निर्मितीसाठी किती टन कचरा जमा आहे याची शहानिशा करावी. सदर एजन्सीला चौकशी न करता बिले दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्‍या नुकसानीची जवाबदारी संबंधित प्रशासनाची राहील. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री यांना देण्यात आलेले आहे.

तीन महिन्यांत अडीच हजार टन कचरा ?

जामखेड नगरपरिषद हद्दीत एकूण 12 हजार 254 निवासी मालमत्ता दाखवल्या आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे सदर एजन्सीने मे महिन्यात 800 टन कचरा ,जून महिन्यात 993 टन व एप्रिल महिन्यात 866 टन असा एकूण 2 हजार 659 टन एवढा कचरा रोडा राडा गोळा केल्याची नोंद केली आहे. एवढा रोडा राडा कचरा नगरपरिषद हद्दीत निघत नाही तरीही या तीनही महिन्यांचे देयक बिल यापूर्वीच उचललेले आहे, असा आरोप सय्यद यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com