
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड नगरपरिषदेने बाजार तळ परिसरात व्यवसायीक गाळे उभारण्याच्या पार्श्वभूमीवर किरकोळ फळ विक्रेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत. प्रथम त्यांना पर्यायी जागा द्यावी अन्यथा आदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत वंचित बहुजनचे डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षापासून विविध फळे विकून हे छोटे व्यवसाईक आपली उपजिविका चालवत आहेत. बाजारतळावरील नगरपरिषद हद्दीतील जागेवर फळाचा गाडा लावून तसेच शासकीय नियमाप्रमाणे कर अदा करून व्यापारी फळे विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
परंतु आता त्या जागेवरती नगरपरिषदेने शॉपिंग सेंटरचे बांधकाम सुरू केले आहे. सर्वांना नोटीसा बजावून दुकाने काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे व्यावसायिक दुसर्या ठिकाणी दुकाने घेऊन जाण्यास तयार आहोत. मात्र नगरपरिषदने दुसरी पर्यायी जागा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी नगरपरिषद प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी उपस्थित व्यवसाईकांना दिले.
निवेदन देताना वचित बहुजन आघाडीचे राज्य भटके - विमुक्त राज्य समन्वयक अॅड. डॉ. अरुण जाधव, लोकधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ, वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुकाध्यक्ष अध्यक्ष अतिश पारवे, जमीर बागवान, सुरेश जाधव, सुनिल शिंदे, आजीनाथ शिंदे, राजू पवार, फिरोज बागवान, वंचित बहुजन आघाडी जामखेड शहर अध्यक्ष अजिनाथ शिंदे, आय्यास बागवान, गौतम भाकरे, व्दारका पवार नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.