
जामखेड | Jamkhed
कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या सभापती पदाची निवड येत्या 16 मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत भाजप 9 व राष्ट्रवादीचे 9 उमेदवार विजयी झालेले आहेत. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीपुर्वी झालेले आरोप, प्रत्यारोप, राजकीय कुरघोडी, विकास कामांचा श्रेयवाद या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुर्ण ताकद पणाला लावल्याने ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती.
तसेच अगामी विधानसभा निवडणुकीची ट्रायल म्हणुन याकडे पाहिले जात होते. परंतु मतदारांनी दोघांना फिप्टी फिप्टी कौल देत दोघांना सारखी पसंती असल्याचे दाखवून दिले आहे. आता सभापती कोणाचा होणार यासाठी दोन्ही पक्षातील अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचे वास्तव आहे.
जामखेड तालुका आ. शिंदेंचा बालेकिल्ला असून येथील बाजार समितीवर आ. शिंदे गटाचे वर्चस्व होते. विधानसभा निवडणुकीत आ. रोहित पवार विजयी झाल्यानंतर पुढील दोन वर्षात त्यांनी कर्जतसह जामखेड येथील शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या अनेक संस्था आपल्या अधीपत्त्याखाली आणण्याचा धडाका लावला होता. यासाठी शिंदे यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशही घडवून आणला होता. यामध्ये आ. शिंदे यांचे अनेक जवळचे शिलेदार आ. रोहित पवार यांना मिळाले होते. पंरतु शिंदे यांना विधान परिषदेतून पुन्हा संधी मिळाल्याने तसेच अचानक संत्तांतर होऊन भाजप शिंदे गटाची सत्ता आली.
यामुळे शिंदे यांना पुन्हा ताकद मिळाली. याच्या परिणामी शिंदेचे दुरावलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा त्यांच्याकडे आले. शासनाकडून अनेक विकास कामे आणण्यात त्यांना यश आले. परंतु या विकास कामांच्या श्रेयवादावरून दोन्ही पक्ष व दोन्ही आमदारांकडून ऐकमेकांवर चिखलफेकही झाली. याच्या परिणामी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अगोदारच मोठी पार्श्वभूमी तयार झाली होती. दोन्ही आमदारांनी आपली पुर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती. दोन्ही आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
कर्जत बाजार समितीचे निकाल हाती आल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही पॅनलला नऊ नऊ अशा जागा मिळाल्या. यामुळे जामखेडच्या बाजार समितीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन दिवसाच्या अंतराने झालेल्या या निवडणुकीत जामखेडलाही कर्जतचीच पुनरावृत्ती झाली. जामखेड बाजार समितीत सुद्धा दोन्ही आमदारांना मतदारांनी नऊ नऊ असा समान कौल दिला. एकाच विधानसभा मतदारसंघातील दोन्ही बाजार समितीचा निकाल समान लागणे व दोन्ही ठिकाणी मतदारांनी दोन्ही आमदारांना समान कौल देणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे.
रोहित पवार प्लसमध्ये
जामखेड बाजार समिती यापुर्वी आ. प्रा. राम शिंदे यांच्या अध्यपत्याखाली होती. आतापर्यंत बाजार समितीत पवार यांचा एकही सदस्य नसताना आ. रोहित पवार यांनी निम्मे उमेदवार निवडुन आणुन त्या संस्थांमध्ये आपली ताकद निर्माण केली आहे. यामुळे मतदारांचा कौल फिप्टी फिप्टी असला तरी रोहित पवारांनी बाजी मरल्याचे मानले जात आहे.