जामखेड शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू
सार्वमत

जामखेड शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू

काही व्यापार्‍यांचा बंदला विरोध तर काहींचा पाठिंबा

Arvind Arkhade

जामखेड|तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहरामध्ये करोनाचे रुग्ण वाढल्यामुळे आज दि. 8 ते 12 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आले असल्याने जामखेड शहर बंद राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा दूध, भाजीपाला, पाणी, दवाखाने आणि मेडिकल चालू राहतील असा निर्णय तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी व्यापारी व विविध संघटनेच्या बैठकीत घेतला आहे.

तहसील कार्यालयात व्यापारी, लघु व मोठे व्यावसायिक यांच्या उपस्थितीत तहसीलदार नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, कामगार तलाठी सुखदेव कारंडे उपस्थित होते. मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, करोना साखळी तोडण्यासाठी 14 दिवस लॉकडाऊन असणे गरजेचे आहे पण ते सध्या शक्य नाही तसेच याबाबत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करावे. यापुढील काळात दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्याची ग्वाही दिली.

राहूल उगले, शरद शिंगवी, कांतीलाल कोठारी यांनी यापूर्वी तीन महिने लॉकडाऊन होते, त्यामुळे अर्थकारण बिघडले आहे. उलट 9 ते 7 वेळ वाढवावा करोना प्रतिबंधासाठी शासनाच्या ज्या मार्गदर्शक सुचना असतील त्याचे पालन केले जाईल तसेच लॉकडाऊन काळात अनेक दुकानदारांनी ग्राहकाला दुकानात घेऊन माल चढ्या दराने विकलेला आहे. किराणा दुकानदार बंदमध्ये गोरगरीब, किरकोळ दुकानदार यांना चढया भावाने माल विकतात. जामखेड बंद करून काहीच फायदा नाही कारण ज्या त्या नागरिकांनी, महिलांनी आपल्या जवळ सॅनिटायझर, मास्क ठेवावे स्वता:ची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. काळजी प्रत्येकाने काळजी घेतली ना काहीच होत नाही. त्यामुळे जनता कर्फ्यू नको आहे. जो तो काळजी घेईल असे सांगितले.

विनायक राऊत, परशुराम डोंगरे, विठ्ठलराव राऊत व गणेश तोडकरी या किराणा दुकानदारांनी व मोबाईल शॉपी संघटनेचे सुनील जगताप आदींनी करोना रूग्णांची वाढती संख्या पाहता साखळी तोडण्यासाठी आठ दिवस पूर्ण लॉकडाऊन ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्याबाबत प्रशासनाने भूमिका मांडावी असे सांगितले.

तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचना व सर्व दुकानदारांनी ग्राहकांची नोंद, मास्क असलेला ग्राहक व सॅनिटायझर व पाचपेक्षा जास्त लोक दुकानात राहणार नाही तसेच जेथे कामगार पाच पेक्षा जास्त असेल तेथील दुकानदार व कामगार यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट झाल्याशिवाय दुकान उघडू दिले जाणार नाही. लॉकडाऊन आम्हाला करता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला तर जनता कर्फ्यू नावाखाली लॉकडाऊन करता येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com