चौंडीचे चुलता-पुतण्याचे मृतदेह बारा तासांनंतर सापडले

चौंडीचे चुलता-पुतण्याचे मृतदेह बारा तासांनंतर सापडले

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील चौंडी येथील सिना नदीवर मंगळवारी (दि. 13) सायंकाळी सहाच्या दरम्यान मासे पकडण्यासाठी

गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे (वय 43) हे चुलता पुतणे गेले होते. मासे पकडताना बंधार्‍यात त्या दोघांचा तोल जाऊन ते नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून जोरदार वाहत्या पाण्यात वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह दुसर्‍या दिवशी बुधवारी (दि. 14) तब्बल 12 तासांनी आढळून आले.

सीना नदीत दोन इसम वाहून गेल्याची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील त्यांच्या पथकासह चौंडी येथे मंगळवारी घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचा आढावा घेऊन व नदीजवळ अंधार असल्याने उजेडासाठी जनरेटर लावून त्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली.

पण पाण्याचा वेग आणि अंधार असल्याने शोध मोहिमेत अडथळे निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. अंधारात काहीच करता येत नसल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी पावणे सहा वाजता दोन्ही चुलता पुतण्यांचे मृतदेह आढळून आले. दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी जामखेडला पाठवण्यात आले होते.

जामखेड तालुक्यात सध्या मागील अठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील सर्व तलाव, नदी, नाले व बंधारे ओसंडून वाहत आहेत. चौंडी येथील सीना नदीला देखील पूर आला आहे. येथील के. टी. वेअर बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. बुधवारी (दि. 13) सायंकाळी येथे राहणारा पुतण्या तुषार गुलाबराव सोनवणे, त्याचे चुलते सतीश बुवाजी सोनवणे व इतर एक असे तिघे मासे पकडण्यासाठी बंधार्‍यावर गेले होते.

चुलते-पुतणे हे या केटीवेअर बंधार्‍याच्या खालच्या बाजूला मासे पकडत होते. तर तिसरा हा बंधार्‍याच्या बाजुला बसला होता. याच दरम्यान पाण्याचा वेग जादा असल्याने यामध्ये चुलता व पुतण्या हे पाण्यात पडून वाहून गेले. ही घटना बाजुला उभ्या असलेल्या तिसर्‍या मुलाने गावात जाऊन सांगितली. यानंतर सदरची घटना लक्षात आली.

रात्री अंधार असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. याठिकाणी जनरेटरच्या लाईटद्वारे शोधमोहीम सुरू होती. रात्री उशिरापर्यंत या दोघांचा शोध लागला नाही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या सहकार्याने पावणे सहा वाजता म्हणजेच बारा तासांनी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. दोन्ही मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. चौंडीत चुलते पुतणे जाण्याने चौंडीसह जामखेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com