खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला!

 खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला!

जामखेड । तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीवरील एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेने खर्डासह जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२ ) असे खुन झालेल्या युवकाचे नाव आहे. खुनाच्या घटनेमुळे खर्डा परिसरासह जामखेड तालुका हादरून गेला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल ईश्वर सुर्वे हा युवक आपल्या मालकीच्या एम एच १६ सीडी १२१९ या जितो कंपनीचा छोटा टेम्पो घेऊन खर्डा शहरानजीक सुर्वेवस्तीकडे जात असताना अज्ञात इसमांनी त्याचा टॅम्पो अडवून अज्ञात कारणावरून कुठल्यातरी टणक हत्याराने विशाल याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जबर मारहाण केली.

या मारहाणीत विशाल सुर्वेचा जागेवर मृत्यू झाला यावेळी हल्लेखोरांनी मयत विशाल सुर्वे याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकुण दोन हजार आठशे रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा झाले ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३०२, ३९४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयताचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे (वय २३) याने जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी फिर्याद दाखल केली आहे.

दरम्यान शनिवारी सकाळी घटना उघडकीस झाल्यानंतर जामखेड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.जामखेड ग्रामीण रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. विशाल सुर्वे या तरूणाच्या निधनामुळे खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे.

विशाल सुर्वे या तरूणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला? विशालच्या खुनामागे कोणाचा हात आहे? याचा जामखेड गुन्हे शोध पथक वेगाने तपास करत आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी भेट दिली. तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, डॉग पथक, ठसे तज्ञ, यानी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे

Related Stories

No stories found.