
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed
राज्यात बंदी असलेले सुमारे 8 टन (आठ हजार किलो) गोमांस नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामखेड येथून जप्त केले आहे. यासह दोन आयशर टेम्पो व एक कार असा 34 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तौफिक कुरेशी (रा.नगर), मुक्तार अब्दुल करीम शेख (50, रा. श्रीरामपूर), अल्तमश फैयाज चौधरी (24, रा. नालबंदखुट, नगर), महेशकुमार जगदेव लोध (27), सिराज अहमद कल्लु अन्सारी (28), समी अहमद मुर्शरफ खान (28, सर्व रा. शंकरपुरमुका, ता. रिसीया, जिल्हा बहरुच, राज्य उत्तर प्रदेश हल्ली रा. नगर) व सादीक सत्तार कुरेशी (38, रा. खर्डा रोड, जामखेड), शेख अजहर आयुब (29, रा. खडकत, ता. आष्टी, जिल्हा बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांना बातमीदारामार्फत जामखेडच्या दिशेने दोन आयशर ट्रक मधून गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करून गोमांसची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार जामखेड पोलिसांच्या मदतीने जामखेड येथील देशी तडका हॉटेलजवळ रोडवर सापळा लावुन संशयित दोन आयशर टेम्पो येताच ते थांबवून छापा टाकला.
पथकाने टेम्पो चालकास व त्याचे शेजारी बसलेल्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली. पंचासमक्ष दोन्ही आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचे गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली. त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपूस करता त्याने संबंधीत गाडीमध्ये भरलेले गोमस हे तौफिक कुरेशी यांच्या मालकीचे असून गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधून ते विक्री करीता शेख अजहर आयुब याच्याकडे खडकत, (ता. आष्टी, जिल्हा बीड) येथे देण्यासाठी जामखेड येथे पोहच करण्याकरीता चालले असल्याची कबुली दिली. शेख आयुब हो हुंडाई कंपनीचे क्रेटा कारसह पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच तौफिक कुरेशी हा फरार झाला आहे.
जामखेड पोलीस स्टेशन येथे भादविक 269, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील कारवाई जामखेड पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सोपान गोरे, कर्मचारी संदीप पवार, अमोल भोईटे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, विनोद मासाळकर, जालिंदर माने, मयुर गायकवाड व उमाकांत गावडे यांनी केली.
श्रीरामपूरच्या मुक्तारवर संगमनेरातही गुन्हे
पोलीसांनी या कारवाईत जेरबंद केलेला संशयित मुक्तार शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुध्द नगर जिल्ह्यातील संगमनेर पोलीस ठाण्यात दोन व जामखेड पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल आहेत, अल्तमश चौधरी विरुध्द भिंगार व जामखेड पोलीस ठाण्यात असे दोन गुन्हे दाखल आहेत. तौफिक युनूस कुरेशी विरुध्द तोफखाना, कोतवाली, नगर तालुका व जामखेड या पोलीस ठाण्यांत चार गुन्हे दाखल आहेत.