
जामखेड (प्रतिनिधी)
अहमदनगरच्या दक्षिण विभागातील उर्वरीत जामखेड बाजार समितींसाठी आज विक्रमी 98.40 टक्के मतदान झाले. रात्री उशिरा निकाल जाहिर झाला. यामध्ये कर्जत बाजार समितीप्रमाणेच मतदारांनी जामखेड बाजार समितीमध्येही आ. शिंदे व आ. पवार यांचे समान 9 - 9 संचालक निवडुण देत काट्याची टक्कर कायम ठेवली आहे. आता सभापती कोणाचा यावर दोन्ही बाजुंनी मोठी रस्सिखेच होणार आहे.
जामखेड बाजार समितीसाठी आज (दि.30) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी 4 च्या सुमारास संपताच निवडणुक निर्णय अधिकार्यांनी लगेच मजमोजनीची तयरी केली. शहरातल बीड रोड वरील आदित्य मंगल कार्यालयात मतमोजणीला सायंकाळी 7 वाजल्यानंतर सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी तसेच भाजप अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कर्जत बाजार समिती निवडणुकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेवार निवडुण आल्याने जामखेड बाजार समिती निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र मतदारांनी दिलेल्या कौलामुळे दोन्ही पक्षांची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे.
सत्ताधारी आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी समोरासमोर पॅनल उभे करून निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण केली होती. दोन्ही पॅनलने विजयाचे दावे केले होते, मात्र मतदारांनी आमदार रोहित पवारांच्या सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला 9 जागा तर आमदार राम शिंदेच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला 9 जागेवर विजय मिळवून दिला आहे.
जसे जसे निकाल जाहिर होत गेले तसतसे दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांकडून गुललाची उधळण व घोषणा बाजी होत होती. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
विजयी उमेदवार
आ. राम शिंदे गटः गौतम उतेकर, सचिन घुमरे, विष्णू भोंडवे. डॉ. गणेश जगताप, शरद कार्ले, वैजिनाथ पाटील, सीताराम ससाणे, नंदकुमार गोरे, रवींद्र हुलगुंडे आदी.
आ. रोहित पवार गट : सुधीर राळेभात, कैलास वराट, अंकुश ढवळे, सतिश शिंदे, रतन चव्हाण, अनिता शिंदे, नारायण जयभाय, सुरेश पवार, राहुल बेदमुथा आदी.