जलयुक्त शिवार योजनेत जिरायती गावांना टाळले

राहाता तालुक्यातील 21 बागायती गावांची निवड
जलयुक्त शिवार योजनेत जिरायती गावांना टाळले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी व टंचाईग्रस्त गावांना जलसमृद्ध करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार अभियान दोन सुरू केले आहे. राहाता तालुक्यामध्ये 21 गावांची निवड यामध्ये निवड समितीकडून करण्यात आलेली आहे. मात्र ही सर्व गावे पाटपाण्याची सोय असणारी आहेत. तालुक्यातील जिराईत व कोरडवाहू असणार्‍या एकाही गावाचा यामध्ये समावेश नसल्याने बागायती गावांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. समितीने पुनर्विचार करून जिरायती गावांचाही या योजनेत समावेश करावा, अशी मागणी होत आहे.

पावसाळ्यात पडलेले पावसाचे पाणी पुढे नाले, तळे, पाझर तलाव यामध्ये साठवून जमिनीत जिरवण्यासाठी व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शिंदे-फडणीस सरकारने जलयुक्त शिवार अभियान 2 सुरू केले आहे. यामध्ये गावातील सार्वजनिक व शासकीय ओढे, नाले, तलाव उकरण्यात येऊन त्यांची खोली वाढवली जाते. या योजनेअंतर्गत राहाता तालुक्यात 21 गावांची निवड करण्यात आलेली आहे.

यामध्ये पाथरे बुद्रूक, लोणी बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, भगवतीपूर, रांजणगाव बुद्रूक, सावळीविहीर खुर्द, बुद्रूक, शिंगवे, ममदापूर, नांदूर बुद्रूक, नांदूर्खी खुर्द, नांदूर्खी बुद्रूक, रांजणखोल, साकुरी, अस्तगाव, डोर्‍हाळे, तिसगाव या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी डोर्‍हाळे गाव वगळता सर्व गावे प्रवरा व गोदावरीच्या कालव्यांवरील पाटपाण्याचे लाभधारक गाव आहेत.

तालुक्यातील निळवंडेच्या जिरायत भागातील पिंपरी निर्मळ, आडगाव, खडकेवाके, केलवड, लोणी खुर्द आदी पंधरा ते वीस गावे जिरायती व कायमच दुष्काळी आहेत. या जिरायत भागाला अद्याप पाटपाण्याची सोय नसल्याने या भागात जलयुक्तची कामे झाल्यास पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचे पाणी यामध्ये साठवून या भागात किमान खरीप व रब्बीची पिके तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकर्‍यांना मदत होईल.

मात्र निवड समितीने सर्वच बागायती गावे बसवल्याने या जिरायती गावांवर मोठा अन्याय होणार आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून या जिरायत भागातील दुष्काळी गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियान योजनेत करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com