‘जलजीवन’चे निकृष्ट काम खपवून घेणार नाही - आ. तनपुरे

करंजी येथे जलजीवन योजना कामांच्या आढावा बैठकीत इशारा
‘जलजीवन’चे निकृष्ट काम खपवून घेणार नाही - आ. तनपुरे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

जलजीवन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळावे या हेतूने आपण सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मतदारसंघातील प्रत्येक गावासाठी प्रभावीपणे राबवलेली आहे. सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना असून या योजनेचे कुठेही निकृष्ट काम झाले तर खपवून घेणार नाही तसेच जलजीवन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या पूर्ण करायच्या नसतील तर जलजिवन योजनेचे काम करू नका, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

जलजीवन योजनेच्या करंजी येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलजीवन योजनेचे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात अनेक गावांमध्ये काम चालू आहे. याचा आढावा घेण्यासाठी या भागातील ग्रामपंचायत सदस्य तसेच अधिकार्‍यांची बैठक रविवारी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे आयोजित केली होती.

तनपुरे म्हणाले, जलजीवन योजनेंतर्गत सातवड, जोहारवाडी, पवळवाडी, निंबोडी, देवराई, डमाळवाडी या गावातील पिण्याच्या टाक्या मंजूर असूनही अचानकपणे रद्द केल्याचे सांगण्यात आल्याची तक्रार सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक यांनी उपस्थित करताच आमदार तनपुरे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. या मंजूर टाक्यांची कामे केल्याशिवाय या योजनेचे काम करू देणार नाही, असा इशारा दिला. या योजनेची मुळा धरणापासून आलेली मेन पाईप लाईन ही गुंजाळे गावापर्यंत जमिनीच्यावरून आलेली असून पुढेही काही ठिकाणी ही पाईप लाईन जमिनीच्यावरुनच घ्यावी कारण त्यामुळे पाणी चोरीला आळा बसेल, असे तनपुरे म्हणाले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, शिवसेना नेते उद्धव दुसंग, सुनील कराळे, भागिनाथ गवळी, माजी सभापती मिर्झा मणियार, चेअरमन आसाराम अकोलकर, सरपंच अमोल वाघ, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, सरपंच विलास टेमकर, युवानेते अशोक टेमकर, चेअरमन पोपटराव आव्हाड, संतोष गरुड, उपसरपंच नवनाथ आरळेसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी या योजनेतील अडचणी व त्रुटी याविषयी मतं मांडली. या बैठकीस मिरी- तिसगाव नळ पाणी योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे, अ‍ॅड. संदीप अकोलकर, आबासाहेब अकोलकर, महादेव अकोलकर, तुळशीदास शिंदे, सतीश क्षेत्रेसह परिसरातील अनेक कार्यकर्ते, जलजीवनचे अधिकारी, ठेकेदार व ग्रामस्थ हजर होते.

तिसगाव योजनेप्रमाणे स्थिती होऊ नये

पुर्वीची तिसगाव-मिरी-करंजी प्रादेशिक पाणी योजनेसारखीच या योजनेची अवस्था होऊ नये म्हणून या योजनेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही आमदार तनपुरे यावेळी म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com