शिरसाटवाडीसाठी जलजीवनमधून 2 कोटी रुपयांची योजना मंजूर

पुढील 50 वर्षाचा पाणीप्रश्न लागणार मार्गी
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शिरसाटवाडी गावासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेतून 2 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेमुळे शिरसाटवाडी गावचा पुढील 50 वर्षाचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सरपंच भावना अविनाश पालवे यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश पालवे यांनी सांगितले, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जलजीवन मिशन योजनेच्या तालुका आराखड्यामध्ये शिरसाटवाडीचे नावच नाही, आपले गाव या योजनेपासून वंचित राहणार हे लक्षात आल्यानंतर तातडीने 30 मार्च 2021 रोजी ग्रामपंचायतकडून पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाला या योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश व्हावा, यासाठी पत्र दिले. यावर ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार तात्काळ जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला 30 मार्च 2021 रोजीच पंचायत समितीने पत्र दिले यानंतर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा सुरू केला.

तसेच तत्कालीन पालकमंत्री यांची नगर येथे भेट घेऊन ग्रामपंचायतचे पत्र देऊन जलजीवन मिशन योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश करावा, अशी मागणी केली. यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही पालकमंत्र्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधुन शिरसाटवाडी गावाचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करावा असे सांगितले. योजनेपासून गाव वंचित राहू नये, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले व केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेत शिरसाटवाडी गावाचा समावेश झाला आहे. चार महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनचा सव्हे पुर्ण झाला आहे.

या योजनेतून गावठाण, मुंजोबानगर, पडकाचा मळा, खंडोबा माळ, घुले ढाकणे कोंगे वस्ती, शेकडे वस्ती, महादेव मळा, भैरवनाथ वस्ती यासह गावच्या सर्व भागांमध्ये नव्याने पाईपलाईन होणार असून गावामध्ये दीड लाख लिटर क्षमतेची तर फाट्यावर 60 हजार लिटर क्षमतेची अशा दोन पाण्याच्या टाक्या चाळीस फूट उंचीवर बांधल्या जाणार आहे. यामुळे शिरसाटवाडी गावचा पुढील 50 ते 60 वर्षाचा पाणी प्रश्न सुटणार आहे, आपले गाव व आपली माणसं या मोठ्या पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाहीत व गावातील प्रत्येक घराला पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे, याचा खूप आनंद होत असल्याचे सरपंच भावना पालवे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com