जलजीवनच्या 829 पाणी योजनांचे टेंडर पूर्ण

जिल्हाचा राज्यात पहिल्या दहामध्ये समावेश || 671 कामांना कार्यारंभ आदेश
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2024 पर्यंत हर घर जल यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना गेल्या दोन वर्षांपासून सुरू केली आहे. नगर जिल्हा या योजनेला गती देण्यात राज्यात पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आला आहे. या योजनेतून जिल्ह्यात 829 पाणी योजनांची कामे होणार असून त्यासाठी 1 हजार 317 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पैकी आजपर्यंत सर्व 829 पाणी योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून 671 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सन 2020 ते 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील 40 लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणार्‍या जुन्या योजनादेखील आता 55 लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत.

सर्व शाळा, अंगणवाड्या यांनादेखील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घराजवळ नळजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा शाश्वत व्हावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करणे व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाच कोटी खर्चापर्यंतच्या कामांना मंजुरी दिली जाते. त्यापुढील खर्चाची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून केली जातात.

जलजीवन मिशन योजनेला जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी खास लक्ष देऊन गती दिली आहे. यासाठी त्यांनी मुख्यालयात एका ठिकाणी वॉररूम बनवले असून जलजीवन मिशन संदर्भातील सर्व कामे या वॉररूममधून चालतात. कामे मंजुरीच्या फाईल बांधकाम विभाग, अर्थ विभागात न फिरता हेच अधिकारी या वॉररूममध्ये येऊन सह्या करतात. त्यामुळे कामांच्या तांत्रिक, प्रशासकीय मंजुर्‍या, निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश अशी कामे एकाच ठिकाणी होत आहेत. प्रारंभी पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता आनंद रूपनर, प्रवीण जोशी व आता श्रीरंग गडधे यांचे सीईओंना सहकार्य मिळाले.

931 गावांची तहान भागणार

नगर जिल्ह्यातील 70 टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आता शंभर टक्के गावे जनजीवन मिशन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी 931 गावांमधील 1 लाख 42 हजार 44 घरांना नळाद्वारे पाणी पुरविले जाणार आहे. 1 हजार 317 कोटी रुपयांची कामे 2024 अखेर पूर्ण करावयाची आहेत. पाणीपुरवठा विभागाने मात्र वेळेपूर्वीच उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com