जळगावात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत

वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
जळगावात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत

चितळी |वार्ताहर| Chitali

राहाता तालुक्यातील पूर्व भागातील जळगाव येथे सध्या 3 ते 4 बिबट्यांचा व पिल्लांचा वावर दिसून येत आहे. दररोज बिबट्या शेतकर्‍यांना दर्शन देत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी तसेच पालक वर्गाकडून होत आहे.

जळगाव येथे 4 थीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी 2 ते अडीच किलोमीटर अंतरावरील चितळी येथील रयतच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावे लागते. या परिसरात सध्या दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे. येथील राजेंद्र आदमने यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने आतापर्यंत डल्ला मारला आहे. तसेच अनेक कुत्री बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. चितळी-जळगाव रस्त्याच्या कडेला पाण्याने भरलेले ओढे वाहत असल्यामुळे बिबट्या येथे नेहमी पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे धोक्याचे झाले आहे.

या गावात सुमारे 3 ते 4 बिबट्यांचा वावर असल्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकरी बोलत आहेत. वन विभागाने किमान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रस्त्याच्या परिसरात एखादा पिंजरा लावावा, अशी पालक व शेतकर्‍यांची अपेक्षा आहे. दोनच दिवसापूर्वी येथील शेतकरी चंद्रकांत चौधरी यांना दिवसा बिबट्याने दर्शन दिले. त्यामुळे त्यांना विहिरीवरील मोटार बंद न करता घराकडे धुम ठोकली. सुदैवाने बिबट्याने त्यांच्यावर चाल न केल्याने ते बचावले.

त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसरात पिंजर्‍याची व्यवस्था करावी अशी मागणी राजेंद्र आदमने, चंद्रकांत चौधरी, बाबासाहेब चौधरी, अशोक चौधरी, बाळासाहेब वाणी, शिवाजी चौधरी, विलास चौधरी, जालिंदर सोनवणे, महेंद्र चौधरी, विजय चौधरी, हुसेन इनामदार आदींसह शेतकरी व पालकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com