
टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
केंद्र सरकारची जलजीवन मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी संकल्पना असून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाचे पाणी दिले जाणार आहे. पाण्याची उपलब्धता करण्यासाठी नदीजोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळातील नागरिकांशी संवाद वाढवून लाभाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी काम करावे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले.
टाकळीभान येथे आयोजित भाजपा संघटनात्मक बुथ कमेटीच्या बैठकित तेबोलत होतेे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते, माजी सभापती नानासाहेब पवार, शरद नवले, बबन मुठे, गिरधर आसने आदी उपस्थित होते.
मंत्री पटेल म्हणाले, जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक घरात माणसी 55 लिटर पाणी देण्यात येणार आहे. जगाच्या लोकसंख्येच्या 18 टक्के लोकसंख्या भारत देशाची आहे. त्यामानाने 4 टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी नदीजोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतला आहे. 2024 पर्यंत खेड्यात व गावात घराघरांत नळाचे पाणी या मिशनद्वारे पोहचवले जाणार आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व असून भविष्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापर करण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत.
ते म्हणाले, भाजपा हा जात धर्म न पाळणारा पक्ष असून नागरिकांना सुविधा देण्याचे काम करीत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळेची शिस्त पाळली पाहीजे. लाभाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथ कार्यकर्त्यांचा नागरिकांशी संवाद असलाच पाहिजे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी जिल्ह्यातील व तालुक्यातील भाजपाच्या कामाचा आढावा मांडला.
यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, नानासाहेब शिंदे, विठ्ठल राऊत, गणेश मुदगुले, युवा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, नितीन भागडे, शंतनू फोपसे, मारुती बिंगले, प्रफुल्ल डावरे, रुपेश हरकल, महिला आघाडीच्या रेखा रिंगे, अनिता शर्मा, श्रीम. हरदास, सुप्रिया धुमाळ, मिलिंदकुमार साळवे, कृष्णा वेताळ, भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, राहुल पटारे, चंद्रकांत थोरात, भारत गुंजाळ तसेच बुथ कमेटी सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक नारायण काळे यांनी केले तर सूत्रसंचालन मुकुंद हापसे यांनी केले.