जखणगावात जातगणना सुरू

9 नोव्हेंबरला सरकारला अहवाल पाठवणार
जखणगावात जातगणना सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बिहारमध्ये झालेली जात गणना व तिच्या अहवालावरून उठलेले वादंग पाहता नगर जिल्ह्यातील एका गावानेही असे धाडस दाखवले आहे. नगर तालुक्यातील जखणगावने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसंसदेच्या 30 ऑक्टोबरला झालेल्या मासिक बैठकीत हा निर्णय घेतला व बुधवारपासून (दि. 1) जात गणना सुरू केली. तिचा अहवाल 9 नोव्हेंबरला राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील पहिले गाव असावे.

जखणगावचे सरपंच डॉ. सुनील गंधे यांनी बैठकीत गावातील सर्व नागरिकांची जातनिहाय जनगणना करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडला. मराठा आरक्षणासंबंधी तांत्रिक बाजूंची पूर्तता करण्यासाठी जातनिहाय गणना होणे आवश्यक असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्याला गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड. बाळासाहेब कर्डिले यांनी अनुमोदन दिले व सर्व ग्रामस्थांनी हा ठराव सर्वानुमते संमत केला. मराठा आरक्षण व बदललेल्या परिस्थितीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली.

जखणगावने राज्यात पहिल्यांदाच असे धाडस दाखवून जातनिहाय जनगणना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या 9 दिवसात गावातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, मानधनावर काम करणारे सर्व सेवक व पदाधिकारी यांच्यामार्फत जनगणनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com