जाफराबादच्या साठवण तलावामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

नुकसानीची भरपाई मिळवून देणार; आ. लहु कानडे यांचे आश्वासन
जाफराबादच्या साठवण तलावामुळे शेतकर्‍यांचे नुकसान

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलावामुळे नायगाव आणि जाफराबादच्या शेतकर्‍यांचे हाता- तोंडाशी आलेले

पिकांचे मोठे नुकसान झाले असून या पिकांची नुकसान भरपाई मिळवून देणारच, असे आश्वासन आ. लहु कानडे यांनी शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी करतांना दिले.

यावेळी त्यांच्यासमवेत ज्येेष्ठ नेते इंद्रभान थोरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीशराव बोर्डे, बाबासाहेब कोळसे,गोविंदराव वाघ, राजेंद्र औताडे आदी उपस्थित होते.

जाफराबाद येथील साठवण तलाव यावर्षी क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने लगतच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांनी तहसीलदार प्रशांत पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार यांच्यासह आ. लहु कानडे यांना निवेदन दिले होते.

आमदार कानडे यांनी तत्पर भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी शेतकर्‍यांनी सांगितले, पाण्यामुळे आमची उभी पिके जळाली असून सोयाबीन, कपाशी, मका, ऊस, बाजरी आदींसह कांद्याच्या चाळीसह काही घरांमध्ये पाणी गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या आशिर्वादाने चालत असलेली अवैध वाळू वाहतुकीमुळे देखील सुद्धा आमच्या जीविताला धोका असल्याचे सांगत साठवण तलावाच्या पाण्यामुळे आम्हाला भरपाई मिळण्याची मागणी यावेळी केली.

याप्रसंगी आ. लहु कानडे म्हणाले दोन दिवसांपूर्वीच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले असून लवकरच संपूर्ण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसह तलावाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे करण्यात येतील, साठवण तलाव हा 72 च्या दुष्काळात झाला असून तलाव शेतकर्‍यांच्या हितासाठीच आहे,

तलावासाठी संपादित जमिनी तसेच अधिग्रहण न झालेल्या जमिनी मात्र त्यामध्ये पाण्यामुळे नुकसान झालेल्या जमिनींचे स्वतंत्र पंचनामे करावेत. तसेच वाळूमुळे भयभीत न होता आपण एकजुटीने संघर्ष करू, गां करील तिथे राव काय करेल.

मात्र काही सरकारी प्रशासनातील लोकांनी माती खाल्ल्यामुळे ग्रामस्थ भयाखाली वावरत आहेत, तरीही करोनानंतर त्यांना आसूड दाखवू, असा इशारा आ. कानडे यांनी देत ज्या बाधित शेतकर्‍यांचे पंचनामे करण्यात आले नाही त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी कृषी सहायक अनिल शेजुळ, कामगार तलाठी एन.व्ही. नागापुरे, ग्रामसेवक श्री. लहारे, जाफराबादचे शेतकरी अशोक गायकवाड,जुनेद पटेल, नायगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बुचुडे, डॉ. रा. ना. राशिनकर, संजय राशिनकर, बाळासाहेब लांडे, रामचंद्र लांडे, संपत लांडे,सूर्यकांत बोर्डे, भालचंद्र लांडे, रमेश लांडे, भाऊसाहेब बोर्डे, सुभाष बोर्डे, अशोक बोर्डे, सौ. मिनाबाई मच्छिंद्र लांडे, सुकदेव तुपे, सुभाष लांडे, संभाजी लांडे, प्रमोद लांडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आ. कानडे यांची बैलगाडी सवारी

शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जात असताना पावसामुळे मोठे खड्डे व चिखल असल्यामुळे शेतकर्‍यांनी आ. कानडे यांना बैलगाडीतून जाण्याचा आग्रह केला असता मी शेतकर्‍याचाच मुलगा असल्याचे सांगत बैलगाडीत बसले. त्यांच्या समवेत जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माऊली मुरकुटे, ज्येष्ठ नेते इंद्रभान थोरात, सतीशराव बोर्डे आदींनी बैलगाडीद्वारे शिवार पाहणी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com