जाधव यांच्या प्रवेशास राहुरीत राष्ट्रवादी व जनसेवेच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा विरोध

जाधव यांच्या प्रवेशास राहुरीत राष्ट्रवादी व जनसेवेच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा विरोध

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्याची राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील आमदारकी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने पुन्हा तनपुरे घराण्याकडे आली. त्यांनी काम जोरात सुरू केल्याने विरोधी गटात सामसूम दिसत आहे. त्यातच नगरपरिषद निवडणूक जवळ येताच विरोधी गटातील शहाजी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून खळबळ उडवून दिली. परंतु या प्रवेशास जनसेवा व राष्ट्रवादीच्या जुन्या मंडळींचा प्रखर विरोध दिसत आहे. जुन्या मंडळींकडून याबाबत कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे जनसेवा मंडळात जाधव यांच्या प्रवेशाने ताकद वाढणार की घटणार? या चर्चेला धार आली आहे.

पंधरा वर्षे आमदारकी आपल्याकडे नसताना कार्यकर्त्यांनी निष्ठा दाखवून प्रखरपणे विरोधात काम केले. या प्रवेशामुळे त्यांना न्याय मिळेल का? असा प्रश्न जनसेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्त्यांकडून होत आहे. नगरपरिषद निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होत असून विरोधी मंडळाच्या नगरसेवकांसह अनेकजण जनसेवा मंडळात येण्याची इच्छा व्यक्त करत असल्याची माहिती मिळते.

परंतु यातून जुन्या कार्यकर्त्यांची गळचेपी होईल व जनसेवा मंडळाचे नुकसानच होईल. धाऊन पदरमोड करून काम करणारे कार्यकर्ते शांत होतील, असा धोका कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. कधी यापुढे विरोधकांना प्रवेश देताना त्या-त्या भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नंतर निर्णय घ्यावेत, अशी मागणी जनसेवेचे जुने कार्यकर्ते करीत आहेत.

शहाजी जाधव यांच्या प्रवेशास आमचा प्रखर विरोध आहे. तनपुरे घराण्याबरोबर आम्ही राजकारणात पदार्पण केल्यापासून आहोत. ज्या लोकांनी बाहेरील उमेदवाराबरोबर राहून तनपुरेंवर चिखलफेक करण्याचे काम केले. त्यांना प्रवेश देऊन प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. याबाबत लवकरच परिसरातील निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून पुढील निर्णय श्रेष्ठींपर्यंत पोहोचविणार आहोत.

- किशोर जाधव, माजी उपनगराध्यक्ष राहुरी

जिकडे घुगर्‍या तिकडे उदो-उदो, अशा प्रवृत्तींना आता सुगीचे दिवस राजकारणात आले असताना प्रवेश देताना जनसेवा मंडळाने विचार केला पाहिजे. तालुक्याची अपरिमित हानी करणार्‍या व तालुका विकासापासून वंचित ठेवणार्‍यांना वंचितच राहू द्यावे, ही मागणी जनसेवा मंडळाचे निष्ठावान कार्यकर्ते करीत आहेत.

Related Stories

No stories found.