पर्यटन विकासातून दक्षिणेचा अनुशेष भरणे शक्य!

सार्वमत दक्षिण वर्धापनदिन विशेष
पर्यटन विकासातून दक्षिणेचा अनुशेष भरणे शक्य!

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरित भागासह जिल्ह्यात इतर सर्व तालुके हे पर्जन्यमानाच्यादृष्टीने अवर्षण प्रवण भाग म्हणून ओळखले जातात. उत्तर जिल्ह्यातील काही तालुक्यांत मुळा, भंडारदरा धरणाचे पाणी मिळत असले

तरी उर्वरित भागात शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्याच्या सिंचनाची टक्केवारी ही 27 टक्के असून यात दक्षिण जिल्ह्याचे प्रमाण हे अवघे 8 टक्के आहे. दक्षिण जिल्ह्यात मुलभूत सुविधांसोबत ग्रामपंचायतींचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासोबत सामाजिक आणि राजकीय अनुशेष भरून काढण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात बागायत भागातील पिकांच्या दरासाठी आंदोलन होतात. मात्र, जिल्ह्यात जिरायत शेतीचे क्षेत्र अधिक असताना या जिरायत भागातील शेत पिकांच्या दरासंदर्भात आंदोलने होताना दिसत नाहीत. यामुळे जिरायत भागातील शेतकरी कधी सधन होणार हा प्रश्न आहे...!

जिल्ह्याच्या दक्षिण भागाची अनुशेषाची नेहमी चर्चा होताना दिसते. मात्र, या दक्षिण जिल्ह्यातील काही तालुक्यात राज्यातील सर्वात समृध्द असे हवामान असणारे ठिकाणे असून त्यांचा थंड हवेची ठिकाणे म्हणून विकास झाल्यास महाबळेश्वर, पाचगणी ते अलिकडच्या औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसाळा यापेक्षा पर्यटनास उत्तम थंडगार हवेची ठिकाणे म्हणून विकासाला संधी आहे. नगर दक्षिण जिल्ह्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी नगर आणि पारनेर तालुक्यात हरिशचंद्र डोंगरचा पट्टा संपून बालाघाट डोंगरचा पट्टा सुरू होतो. या दोन तालुक्यांतील 25 टक्के गावे ही या दोन डोंगरात मोडतात. त्यांची उंची ही समुद्र सपाटीपासून 600 ते 700 पेक्षा अधिक आहे. या गावांची उंची राज्यातील अन्य थंड हवेच्या ठिकाणापासून अधिक असून त्याठिकाणी सपाट माथा आहे. यामुळे या ठिकाणी थंड हवेची ठिकाणे म्हणून विकास करण्यास मोठा वाव आहे. या पट्ट्यात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे सामान्य असल्याने वातावरण अल्हादायक आणि प्रसन्न आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये उंची आहे. मात्र, त्याठिकाणी सपाट माथा नसल्याने गावांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यास अडचण आहे. मात्र, नगर आणि पारनेर तालुक्यात वेगळी भौगोलिक परिस्थिती असून त्याचा फायदा घेण्याची वेळ आली आहे.

ब्रिटीश काळात नगर आणि पारनेर तालुक्यांतील या डोंगराळ भागात आणि सातारा जिल्ह्यातील वठार याठिकाणी मील कामगार आणि श्वसनाचे विकार असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दोन-दोन महिने पाठविले जात होते. अशा निसर्गाच्या समृध्दीने नटलेल्या भागात पर्यटन विकासासोबत थंड हवेची ठिकाणे म्हणून विकसीत करण्यास वाव आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात विकसीत झालेल्या म्हैसाळा आणि सातपुड्यात विकसीत झालेल्या पाल यापेक्षा नगर तालुक्यातील आगडगाव, रतडगाव, पारनेरमधील शहांजापूर आणि अन्य गावांचा थंड हवेचे ठिकाण म्हणून विकास करण्यास संधी अधिक आहे. यासह दक्षिणेत वांबोरीपासून ते पाथर्डीपर्यंत असणार्‍या गर्भगिरी पर्वत रांगेत अनेक धार्मिक आणि पर्यटनाची ठिकाणे असून यात गोरक्षनाथ गड, मांजरसुंभे गड, मढी, वृध्देश्वर, जवळच असणारी मोहटा देवी, पारनेर तालुक्यातील कोरठाण खंडोबा यांचा समावेश आहे. तसेच पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिध्द रांजणखळग्याप्रमाणे मुळाच्या पाणलोट क्षेत्रात असणार्‍या नद्या, उपनद्या याठिकाणी खच दर्या असून या खच दरीचा पर्याटनाच्यादृष्टीने विकास करण्यास वाव आहे. तसेच महाराष्ट्रातील एकमेव लवनस्तंभ (मिठाचा खांब) पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या याठिकाणी असून या ठिकाणाची अनेकांना विस्मृती झाली आहे. कर्जत तालुक्यातील रेहुकुरी अभयारण्यात सफारीच्यादृष्टीने काम करून त्याठिकाणी पर्यटकांना आकर्षित करून पर्यटनाच्यादृष्टीने जिल्ह्याच्या दक्षिण भागाचा विकास करून स्थानिक भागाचा विकास निधीतून विकास साधण्यासोबत रोजगार निर्मितीसाठी मोठी संधी आहे.

जिल्ह्यातील उत्तर भागात असणार्‍या अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आणि दक्षिणेतील नगर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड अपवाद वगळता अन्य तालुक्यांना कधीच दीर्घकाळ मंत्रीपद मिळालेले नाही. यामुळे उर्वरित भागात मोडणार्‍या जिल्ह्याचा विशेषत: दक्षिण भागाचा विकास झालाच नाही. विशेष म्हणजे 1965 ते 1990 पर्यंत सर्वाधिक रोजगार हमीवर उपजिवीका भागविणार्‍या दक्षिण भागात दूध व्यवसाय नावारुपाला येऊ लागला. मात्र, त्यावेळी खर्‍याअर्थाने चार्‍याची अडचण निर्माण झाली. या भागात चांगल्या प्रतीच्या गो धनाची गरज असताना संकरित गायींना उच्च प्रतीचे वीर्य न मिळाल्याने नंतरच्या काळात कमी दूध देणार्‍या गो धनाची निर्मिती झाली. उत्तर जिल्ह्यात प्रत्येक नेत्याने आपल्या मतदारसंघात दूध साठवणुकीसाठी शितगृहाची निर्मिती केली. मात्र, हा प्रयोग दक्षिणेत फारसा झाला नाही. यामुळे दक्षिणेतील दूध व्यवसाय पाहिजे तसा बहरला नाही.

जिल्ह्याच्या आकारमानात दक्षिण जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. यामुळे रस्त्यांची लांबी मोठी आहे. तसेच शेतातील वस्त्या गावापासून दूर अंंतरावर आहेत. यात पारनेर, कर्जत, नगर, पाथर्डी, राहुरी आणि श्रीगोंदा याठिकाणी रस्त्यांचा अनुशेष अधिक आहे. यामुळे अनुशेषाप्रमाणे निधीचे वाटप होणे आवश्यक असतानाही दरवर्षी आमदार, जिल्हा परिषद सदस्य यांना समप्रमाणात निधी वाटप करण्यात येतो. यामुळे दक्षिणेतील अनुशेष भरला जात नसल्याचे निरीक्षण आहे. रस्त्यांचा अनुशेष भरण्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय निधीचे वाटप होणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतींच्या दरडोई उत्पन्नात दक्षिणेतील ग्रामपंचायतींचे दरडोई उत्पन्न हे 54 रुपये आहे. तर उत्तरेत हेच प्रमाण हे 96 रुपये आहे. दक्षिण जिल्ह्यातील ग्रामपंचायती त्या अर्थाने श्रीमंत नाहीत. या ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी सरकारने लोकसंख्येऐवजी अनुशेष असणार्‍या ग्रामपंचायतींना आर्थिक निकषावर निधी देणे गरजेचे आहे. तरच दरडोई उत्पन्नाचा अनुशेष भरून निघेल. यासह दक्षिण जिल्ह्यातील पाथर्डी, जामखेड, नगर तालुका, कर्जत, शेवगाव या भागात स्थालांतरीत ऊसतोडणी कामगारांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक अनुशेष असणार्‍या दक्षिणेचा खासदार हा उत्तरेचा आणि कर्जत-जामखेडचे आमदार हे तर जिल्ह्याबाहेरील आहेत. तसेच ज्या प्रमाणे उत्तर जिल्ह्यातील नेत्यांनी राजकीय संस्थांसह शैक्षणिक, सामाजिक, दूध व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग, साखर कारखाने, कुक्कुट पालन संस्था असा बहुआयामी विकास साधला तसे दक्षिणेत झालेले दिसत नाही.

लिफ्ट इरिगेशनचा अभाव

उत्तरेतील मुळा भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात शेती सिंचनासाठी आणण्यासाठी लिफ्ट इरिगेशन योजना राबविण्यात आल्या. मात्र, दक्षिणेतील नगर आणि पारनेर तालुक्यात मुळा धरणातून संधी असतानाही लिफ्ट इरिगेशन झालेले नाही. हिच परिस्थिती कुकडी आणि भिमाच्या बाबतीत आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी संधी असताना दक्षिणेतील काही तालुक्यांतील शेती सिंचनाखाली आलेली नाही. दुसरीकडे राज्यात सांगली जिल्ह्यात दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी कृष्णा, थेरला नदीतून पाणी उचलून शेतकर्‍यांना दिलेले आहे. नगर दक्षिण जिल्ह्यात यादृष्टीने कोण पुढाकार घेणार? हा प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरित आहे.

ज्ञानेश दुधाडे

7720020009

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com