आयटी इंजिनिअरने पिकविली सफरचंद व पांढर्‍या जांभळाची बाग

वाकडी येथील विक्रांत काले या तरुणाचा शेतकर्‍यांपुढे आदर्श
आयटी इंजिनिअरने पिकविली सफरचंद व पांढर्‍या जांभळाची बाग

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

कश्मिर व हिमाचल प्रदेशमध्ये पिकवले जाणारे सफरचंद आता राहाता तालुक्यातील बाकडी येथे पिकविण्यास आयटी इंजिनिअर विक्रांत रूपेंद्र काले यांना यश आले आहे. काले यांनी आपल्या वाकडी येथील शेतात सफरचंदाचे पीक यशस्वीरित्या घेतले असून या होतकरू तरुणाने शेतकर्‍यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

राहाता तालुक्यातील वाकडी खंडोबाची येथील विक्रांत हे आयटी इंजिनियर आहे. लाखो रुपयाचे पॅकेज असलेली नोकरी सोडून त्यांनी शेतीत नवीन पीक घेण्याचा निश्चय केला. याआधी त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पिकणार्‍या सफरचंद पिकाची लागवड यशस्वी केली. तीन वर्षांपूर्वी बारा बाय बारा फुटावर एकरी 325 पांढर्‍या रंगाचे जांभूळाची झाडे बसविली. या तीन वर्षात अंतर पीक देखील घेतले. आता या एका झाडाला सरासरी सात ते आठ किलो फळे निघत आहेत.

अजून दोन ते तीन वर्षांनी याच झाडाला 20 ते 25 किलो फळ निघेल, असे विक्रांत सांगतात. पांढर्‍या रंगाच्या जांभूळ पिकास सरासरी 250 रुपये किलो भाव मिळाला. हे झाड 20 ते 25 वर्षे फळ देऊ शकते. ही फळबाग लावण्यास एकरी सरासरी एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. तीन वर्षे अंतर पिकात हा खर्च निघून येतो. नंतर जशी जशी झाडे वाढतील, त्या प्रमाणात उत्पन्न देखील वाढते. या फळपिकास खते व इतर खर्च कमी आहे. एकरी अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पादन मिळते. हे फळपिक मुळात थायलंड येथील आहे.

विक्रांत यांचे वडील रुपेंद्र काले शेतकरी संघटनेचे अतिशय सक्रिय पदाधिकारी आहे. रुपेंद्र यांचा शेतीचा चांगला अभ्यास आहे. वडिलांची प्रेरणा व मार्गदर्शनाने विक्रांत यांनी शेतात बाहेरील राज्यातील पिके घेतली आहे. आपल्या परिसरात येणार्‍या पिकाबरोबर नवीन पीक कसे घेता येईल व परिसरातील शेतकर्‍यांना देखील या पिकांचा फायदा कसा होई, असा विक्रांत यांचा हेतू असतो. त्यांचे चुलते आनंद काले यांचाही शेती, फळझाडे व फुलझाडे याविषयी चांगला अभ्यास आहे.

विक्रांत यांनी वाकडीसारख्या बदलत्या हवामानाच्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमधील मुख्य पीक सफरचंद फळबाग करण्याचा निश्चय केला. त्यासाठी विक्रांत हे हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन सफरचंदाच्या फळबाग पिकाचा पूर्ण अभ्यास करून आल्यावर त्यांच्या वाकडी येथील शेतातील दीड एकर शेतात एचएमआर व अण्णा जातीची रोपे लावली. या रोपांची 8 बाय 13 फुटावर लागवड केली. एकरी 450 रोपे बसतात. हे रोप 100 ते 150 रुपयात पडते.

सफरचंद रोप लागवड केल्यावर तीन वर्षे आंतरपीक घेता येते. या पिकास इतर फळबाग पिकासारखे फवारे व जास्त खर्चदेखील लागत नाही. वर्षांतून एकदा फळ येणार्‍या या झाडास सुरुवातीला सुमारे 10 किलो फळ निघते. नंतर फळाचे प्रमाण वाढते. या फळझाडाचे 20 वर्षे आयुष्यमान आहे. हे पीक 45 डिग्री तापमानात देखील येते. याची खात्रीदेखील झाली असल्याचे विक्रांत यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com