इस्कॉन व गुगलकडून प्रवरा मेडिकल ट्रस्टला 100 व्हेंटिलेटरची देणगी

राज्यातील सर्वात मोठा 500 बेडचा अतिदक्षता विभाग उभारणार: डॉ.राजेंद्र विखे || अतिदक्षता विभागाचे बुधवारी भूमिपूजन
इस्कॉन व गुगलकडून प्रवरा मेडिकल ट्रस्टला 100 व्हेंटिलेटरची देणगी

लोणी |वार्ताहर| Loni

इस्कॉन आणि गुगलच्यावतीने लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टला आधुनिक 100 व्हेंटिलेटर देणगी म्हणून मिळणार असून बुधवार दि. 13 एप्रिल रोजी त्याचे लोकार्पण होणार आहे. तर एकही रुग्णाला अतिदक्षता विभागात बेड नसल्याने जीव गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्यातील सर्वात मोठा 500 बेडचा अतिदक्षता विभाग उभारणार असून त्याचे भूमिपूजन बुधवारी करण्यात येणार असल्याची माहिती प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

लोणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. विखे म्हणाले की, करोना काळात प्रवरा मेडिकल ट्रस्ट व पिम्स अभिमत विद्यापीठाने अवघ्या सहा दिवसात शंभर बेडचे कोविड सेंटर उभारले. त्यावेळी व्हेंटिलेटरची मागणी मोठी होती. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना खूप कसरत करावी लागली. ऑक्सिजन साठवणुकीसाठी स्वतःचा प्रकल्प तात्काळ उभारला. साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरलाही आम्ही टंचाईच्या काळात ऑक्सिजन पुरवठा केला. व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागाचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील सर्वात मोठा अतिदक्षता विभाग उभारण्याकडे लक्ष केंद्रित केले.

गरीब माणसांना परवडेल अशा दरात अतिदक्षता सुविधा उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सहकार्य मिळवण्याचेही प्रयत्न केले. प्रवरा रुग्णालयाचे काम आणि आरोग्य सेवा लक्षात घेऊन इस्कॉन आणि गुगलने 100 व्हेंटिलेटर देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सध्या रुग्णालयाकडे उपलब्ध असलेल्या अतिदक्षतेच्या 125 बेडची संख्या वाढवण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करून नवीन 365 बेडचा अतिदक्षता विभाग उभारण्याचे काम हाती घेतले आहे. जवळपास 500 अतिदक्षता बेड निर्माण होणार असून राज्यात एवढा मोठा विभाग कुठल्याही रुग्णालयाकडे सध्या नाही.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील गरीब माणसाला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी आयुष्यभर काम केले. त्यांचे विचार त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे घेऊन जाताना आम्ही गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करीत आहोत.

डॉ. विखे पुढे म्हणाले की, बुधवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि पिम्स अभिमत विद्यापीठ यांच्यावतीने डॉ. बाळासाहेब विखे पाटील लेक्चर हॉल कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 100 व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा व राज्यातील सर्वात मोठ्या आयसीयु सेंटरचा कोनशिला अनावरण समारंभ इस्कॉनचे संचालक व गोवर्धन इको व्हिलेजचे गौरंगदास प्रभू यांच्या हस्ते व गुगल इंडियाचे हेल्थ केअर प्रमुख गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिव्हर्सिटीचे चेअरमन उदित शेठ, पार्टनर फॉर सेंटर फॉर रिसर्च अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे हितेश त्रिवेदी, गोवर्धन इकोव्हिलेजचे सोशल इनीशिटीव्ह प्रमुख यचनीत पुष्कर्णा, राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी राकेश नैथानी यांच्या उपस्थिती होणार आहे. हा समारंभ माझ्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या उपक्रमात आ. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगताना त्यांनी प्रवरा परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेला वैद्यकीय महाविद्यालयाचेअधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार हे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com