पाटबंधारे विभागातील कर्मचारी करतोय शेतकर्‍यांकडून बेकायदेशीर वसुली

पाटबंधारे विभागातील कर्मचारी करतोय शेतकर्‍यांकडून बेकायदेशीर वसुली

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील प्रवरा उजव्या कालव्यावर ओझर ते सोनगाव दरम्यान असलेल्या पाटचार्‍यावरील कर्मचारी हा शेतकर्‍यांकडून पाटपाण्यासाठी बेकायदेशीरपणे वसुली करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या कर्मचार्‍याची तात्काळ बदली करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वायरलेस कर्मचार्‍याची प्रवरा उजव्या कालव्यावरील चारी क्रमांक 1 ते 20 वर कालवा निरीक्षकाची जागा रिक्त असल्याने तातपुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली आहे. हा कर्मचारी रोटेशन दरम्यान पाटपाण्यासाठी आवश्यक असलेला फॉर्म भरण्यासाठी प्रति एकर 500 रुपये व फॉर्म फी म्हणून 100 असे 600 रुपये शेतकर्‍यांकडून वसूल करत आहे. तर काही शेतकर्‍यांकडून एकरासाठी तीन वेळा पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोप करून हा कर्मचारी फॉर्म भरल्याची पोहच पावती अथवा शेतकर्‍यांची सही सुध्दा घेत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आमच्याकडून हा कर्मचारी किती क्षेत्राचे पैसे घेतो याचा कोणताही खुलासा होत नसल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच काही शेतकर्‍यांना वैयक्तिक उपसा करण्याची परवानगी असताना कर्मचारी हा 500 ते 1 हजार रुपये घेऊन कोणतीही पावती देत नाही. तसेच त्याने वसुलीसाठी एका खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून शेतकरी व या कर्मचार्‍यामध्ये मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या कर्मचार्‍याची तात्काळ बदली करून याठिकाणी कालवा निरीक्षकाची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. तर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय हा कर्मचारी बेकायदेशीर वसुली करू शकत नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान या कर्मचार्‍याची बदली न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा ओझर ते सोनगाव येथिल शेतकर्‍यांनी दिला असून ओझर, आश्वी खुर्द, माळेवाडी, पिप्रीं लौकी अजमपूर आदींसह परिसरातील शेतकर्‍यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com