बंधार्‍यांच्या लोखंडी फळ्या प्रकरणी शेतकर्‍यांचा उपोषणाचा निर्धार

अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना निवेदन
बंधार्‍यांच्या लोखंडी फळ्या प्रकरणी शेतकर्‍यांचा उपोषणाचा निर्धार

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या लोखंडी फळ्यांच्या चोरीचा तातडीने तपास लावला नाही तर पुणतांबा येथील शेतकर्‍यांनी उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तशा प्रकारचे लेखी निवदेन शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.

यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, उपसरपंच महेश चव्हाण, शिवसेनेचे सुहास वहाडणे, बाळासाहेब चव्हाण रामभाऊ बोरबने, गणपत बोरबने, नामदेव गायकवाड, प्रताप वहाडणे, प्रभाकर बोरबने, चांगदेव बोरबने, रवि जेजूरकर सह शेतकरी उपस्थित होते.

पुणतांबा बंधार्‍याच्या अंदाजे 34 लाख रुपये किमतीच्या 301 फळ्या चोरीस गेलेल्या आहेत. फळ्यांची टप्प्याटप्प्याने चोरी झालेली आहे. सुरुवातीला 30 फळ्यांची चोरी झाली होती. त्याबाबत 2 ऑगस्ट रोजी राहाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. 15 ऑगस्ट रोजी संभाजी गमे या शेतकर्‍याच्या सतर्कतेमुळे फळ्यांची चोरी करणारे आठ चोरटे टेम्पोसह डोणगाव शिवारात पकडून त्यांना राहाता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र पोलिसांना अद्यापही चोरीचे पूर्ण रॅकेट सापडले नसून पूर्ण मुद्देमालही हाती लागलेला नाही. तपास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचा शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे 105 किलो वजनाच्या लोखंडी फळीचे सरकारी मूल्य 11400 रुपये असताना त्याचे मूल्य अवघे 3000 रुपये नमूद केल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या चोरीच्या प्रकरणात आरोपीवर दरोड्याची कलमे लावावीत, असेही निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी गुन्ह्याचा योग्य पद्धतीने लवकर तपास लावण्याचे आश्वासन सौ. भोर यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच कालच 11 वाजेच्या दरम्यान पुणतांब्यातील शिष्टमंडळाने माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची राहाता येथील संपर्क कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. सौ. कोल्हे यांनी राहात्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना बोलावून चोरीच्या प्रकरणाबाबत विचारणा केली तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा करून तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी शिष्टमंडळात बंधारा समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, सुभाषराव वहाडणे, धनंजय जाधव, संभाजी गमे, उपसरपंच महेश चव्हाण, चंद्रकात वाटेकर, गणेश बनकर सह शेतकरी वर्ग उपस्थित होते. बंधार्‍याच्या फळ्यांच्या चोरीप्रकरणी शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड तसेच डीवायएसपी संजय सातव यांचीही भेट घेतलेली आहे.

फळ्यांच्या चोरीचा तपास लवकर लागला नाही तर सप्टेंबरमध्ये बंधार्‍यात पाणी अडविणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्याचा फटका अंदाजे 3 हजार एकर क्षेत्राला होणार आहे. त्यामुळे या प्रश्नावर पुणतांबा, डोणगाव, रास्तापूरसह अनेक गावांतील शेतकरी एकत्रित आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com