आयपीएल सट्टेबाजीवर नाशिक पथकाची धाड

नगर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह: तिघांविरूध्द गुन्हा, एक अटकेत
आयपीएल सट्टेबाजीवर नाशिक पथकाची धाड

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामावर अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अहमदनगर शहर पोलिसांनी या सट्टेबाजीकडे दुर्लक्ष केल्याने दैनिक सार्वमतच्या गुरूवार 14 एप्रिल, 2022 च्या अंकात ‘आयपीएल सट्टेबाजीच्या मोहात तरूण पिढी बरबाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते.

याची दखल घेत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री अहमदनगर शहरात येत आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई केली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. बुरूडगाव रोडवरील चाणक्य चौफुलीजवळ विशेष पथकाने ही कारवाई केल्याने एलसीबीसह शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांच्यासह अधिकारी, अंमलदारांनी आयपीएल सट्टेबाजीवर कारवाई केली. पथकातील पोलीस नाईक प्रमोद सोनु मंडलीक यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक विठ्ठलराव देशमुख (वय 22 मुळ रा. कोरडगाव ता. पाथर्डी, सध्या रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर), राहुल गवळी (रा. केडगाव) व स्वप्नील रामचंद्र परवते (रा. सारसनगर, अहमदनगर) यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रिकेटचे वेड असलेली व कमी वेळात जास्त पैसा मिळण्याच्या लोभापायी या सट्टेबाजीत तरूण पिढी बरबाद होत आहे. मध्यंतरी कोतवाली पोलिसांनी सट्टेबाजी चालविणार्‍या बुकीवर कारवाई करत त्यांना अटक केली होती. मात्र छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या या सट्टेबाजीवर एलसीबी व शहर पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नव्हती. कारवाईकडे पोलिसांचा कानाडोळा झाल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांनी एक पथक तयार करून अहमदनगरला धाडले.

पथकाचे प्रमुख निरीक्षक रोहोम यांनी शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता बुरूडगाव रोडवरील चाणक्य चौफुलीजवळ छापा टाकला. यावेळी एकाला ताब्यात घेत अटक करण्यात आली. दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपी देशमुखकडून 15 हजार 200 रूपयांची रोख रक्कम, एक दुचाकी, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) चे कलम लावण्यात आल्याने आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

असा सुरू होता डाव

उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांच्या पथकाने शनिवारी छापा टाकला त्यावेळी अहमदनगर शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टेबाजीचा भंडाफोड झाला. आरोपींकडून मोबाईलवर मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे सट्टेबाजांना आयडी व पासवर्ड दिला जात होता. सट्टेबाजांना त्यांच्या फोनवर अ‍ॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जात होते. त्या अ‍ॅपवर आयडी व पासवर्डचा वापर करून आयपीएलवर सट्टेबाजी सुरू होती. त्यासाठी आरोपींनी सट्टेबाजांकडून फोन पे अ‍ॅपवर पैसे घेतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अशा पध्दतीने अनेक तरूणांना आयपीएलच्या सट्टेबाजीच्या मोहात ओढून त्यांची लुट सुरू असल्याचा प्रकार नाशिक पथकाने उघडकीस आणला आहे.

अन् एलसीबीने प्रेसनोट काढली...

नाशिक पथकाने शनिवारी रात्री आयपीएल सट्टेबाजीवर मोठी कारवाई केली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री एलसीबीने तोफखाना हद्दीतील सुर्यनगर भागात कारवाई करून चेतन पांडुरंग वराडे (वय 41 रा. सुर्यनगर) याला ताब्यात घेतले. दरम्यान याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नव्हती. शनिवारी रात्री नाशिक पथकाने कारवाई केल्यानंतर रविवारी दुपारनंतर एलसीबीकडून आयपीएल कारवाई बाबत प्रेसनोट देण्यात आली. दरम्यान नाशिक पोलिसांनी कोतवाली ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) प्रमाणे कलमे लावली आहे. मात्र एलसीबीने तोफखाना पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्यात फक्त महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) कलम लावले आहे. यामुळे एलसीबीची ही कारवाई जुजबी मानली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com