हल्लेखोर बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करा

निमगाव खैरी ग्रामस्थांचेे वनविभागाला निवेदन
हल्लेखोर बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करा

खैरी निमगाव |वार्ताहर|Khairi Nimgav

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील शेजुळवस्ती याठिकाणी महिलेस मोटारसायकलवरून ओढून बिबट्याने हल्ला केल्याने या भागातील नागरीक भयभीत व संतप्त झाले आहेत. ही सहावी घटना असल्याने वन विभागाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली असून यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने वनविभागाला निवेदन दिले.

खैरी निमगाव येथील उद्धव साबळे हे पत्नी व मुलासह शेतीची कामे आटोपून घरी जात असताना काशीनाथ शेजुळ यांच्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटार सायकलवर मागे बसलेल्या साबळे यांच्या पत्नीला मोटारसायकलवरून ओढले. मोटारसायकलवरील वडील उद्धव साबळे आणि मुलाने गाडी थांबवली. मुलाने आईला वाचविण्यासाठी दगड फेकला असता बिबट्या गिन्नी गवतात घुसला थोड्या वेळात त्या गिन्नी गवतातून बाहेर आलेल्या दोन बिबट्यांनी त्या महिलेवर हल्ला केला. मुलाने आईला वाचवण्याकरिता पुढे होताच बिबट्यांनी त्याच्यावरही हल्ला केला.

मागील तीन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्याच्या सहा घटना घडल्या असून अनुक्रमे संकेत झुराळे, वदक बंधू, दुशींग, डांगे, आदीवासी बंधू आणि ही सहावी घटना आहे. या घटनेने नागरीक भयभीत झाले आहेत. यामुळे नागरिकांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी भाऊसाहेब गाढे यांना लेखी निवेदन दिलेे. वन विभागाने ठोस पावले उचलुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अथवा कुठलीही पूर्वसूचना न देता रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा वन विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनावर शिवाजी साबळे, अनिल दौंड, वाल्मीक शेजुळ, विठ्ठल शेजुळ, नामदेव शेजुळ, जालिंदर शेजुळ, किशोर वदक, पत्रकार साईनाथ बनकर यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com