कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

आपल्या मुलीने मनाविरुद्ध विवाह केल्याचा राग मनात धरून विवाहित मुलीच्या आईने मुलीच्या सासरी येऊन तिच्या घरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली.

याबाबत आई सुमनबाई पंडितराव थोरे हिचे विरुद्ध मुलगी यशोदा प्रतीक कुलकर्णी हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

यशोदा कुलकर्णी हिने काही दिवसापूर्वी आपल्या मर्जीने एका परजातीय मुलाशी आंतरजातीय विवाह केला आहे. त्याचा मुलीच्या घरच्या मंडळींना राग होता.व तो वेळोवेळी व्यक्त होता होता.त्याच कारणातून फिर्यादी मुलीची पुण्यात जामळवाडी रोड सिद्धिविनायक सोसायटी कात्रज येथे रहिवाशी असलेली आई हिला राग आला होता. तिने वारंवार विरोध करूनही मुलीने आपले ऐकले नाही याचा मनात राग धरून हि महिला नुकतीच आपल्या खाजगी नोकरीत असलेल्या मुलीच्या कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील घरी येऊन काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे सासरची सर्व मंडळी घाबरून गेले आहेत. मुलीने अखेर आपल्या आई सुमनबाई थोरे यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करणार्या महिलेला संत जनार्दन स्वामी रुग्णालयांत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.क्रं .555 / 2020 भा.द.वि.कलम 447,504,506 प्रमाणे फिर्यादी मुलीच्या आई सुमनबाई थोरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहे.