आंतरजिल्हा बदलीत चुकीची माहिती देणार्‍या शिक्षकांची वेतनवाढ थांबणार

बदलीची संधी हुकणार
आंतरजिल्हा बदलीत चुकीची माहिती देणार्‍या शिक्षकांची वेतनवाढ थांबणार

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदली करू पाहणार्‍या शिक्षकांनी त्यासाठी आवश्यक ती माहिती ऑनलाईन सादर केली आहे. तथापि काही शिक्षकांनी चुकीची माहिती सादर केली असल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित शिक्षकांची माहिती पडताळणी करून चुकीची माहिती सादर करणार्‍या शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने देण्यात आले आहेत. त्याचबरोबर संबंधित शिक्षकांना बदली प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देखील हुकणार आहे.

सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही बाबत बदलीस पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग-1 मधील, विशेष संवर्ग भाग-2 मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी ठरविण्यात आलेले धोरण व त्यानुषंगाने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून सदर धोरणातील तरतुदीप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमार्फत अर्ज सादर करण्यासंदर्भात शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र धारक शिक्षक आणि विशेष संवर्ग-1 शिक्षक यांना बदलीमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेल्या अशा शिक्षकांनी त्यांचे अर्ज भरताना संपूर्णत: खरी व वस्तुस्थितीदर्शक माहिती भरून अर्ज करणे अपेक्षित आहे. खरी माहिती भरण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने अशा जबाबदार व्यक्तींकडून अर्ज भरताना जाणीवपूर्वक चुकीची व खोटी प्रमाणपत्रे, कागदपत्रे, माहिती सादर केली जाणे अपेक्षित नाही. तथापि काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आहेत, अशा तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत.

अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे जर अर्ज भरल्यास अशा स्वरुपाच्या तक्रारींची विहित वेळेत चौकशी करून संबंधित शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. पडताळणीअंती, ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिध्द होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा. संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. मात्र, बदल्यासंदर्भात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे, अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com