आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्याचे आदेश आज ?

मुहूर्त लागणार की टळणार याकडे गुरूजींचे लक्ष
आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्याचे आदेश आज ?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा आज सोमवार (दि.22) मुहूर्त असल्याचे ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, आतापर्यंत अनेकवेळा प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त ऐनवेळी टळलेला असल्याने बदली पात्र शिक्षकांच्या मनातील धाकधूक कायम आहे.

दरम्यान, शिक्षण विभागातील राज्य पातळीवरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवारपर्यंत (रविवार) पार पडलेल्या ऑनलाइन आणि स्वयंचलित आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही प्रक्रिया 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात नमूद केलेले नियम लागू करून सॉफ्टवेअर प्रणालीने प्रत्येक निर्णयाची गणना कशी केली, यासाठी संपूर्ण लॉग तयार करण्यात आला आहे.

तसेच बदली आदेश प्रणालीमध्ये एनक्रिप्शन अंतर्गत लॉक ठेवण्यात आले आहेत. आज ग्रामविकास विभाग ते अनलॉक करणार आहेत. लॉक उघडताच, प्रत्येक शिक्षकाला ई-मेलव्दारे बदलीची ऑर्डर प्राप्त होणार असून आणि ती सिस्टममध्ये लॉग इन करून डाउनलोड देखील करता येणार आहे. तोपर्यंत हा डेटा पाहणे अशक्य आहे.

दरम्यान, बदली झालेल्या आंतरजिल्हा शिक्षकांची यादी उपलब्ध झाल्यावर जिल्ह्यातून किती शिक्षक आंतरजिल्ह्याने आले आणि बदलून गेले हे समजणार असल्याचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी या बदल्याची माहिती उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यात एसी 70, एसटी 154, एसटी (पेसा) 28, व्हीजेएनटी शुन्य, एनटीसी उणे 165 (अतिरिक्त), एनटीडी उणे 53 (अतिरिक्त), एसबीसी उणे 13 (अतिरिक्त), ओबीसी 50, ईडब्यूएस 45 आणि ओपन 131 अशी 478 पदे आंतरजिल्हा बदलीसाठी रिक्त आहेत. यातून किती शिक्षकांची बदलीची लॉटरी लागणार हे बदलीनंतर समोर येणार आहे.

दरम्यान, सुत्रांच्या म्हणण्यानूसार बदलीचा आदेशानंतर, संबंधीत शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करणे प्रत्येक त्यात्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांवर अवलंबून राहणार आहे. शिक्षण हक्क कायदा, 2009 च्या कलम 26 अन्वये जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत, यामुळे आंतरजिल्हा बदलीनंतर 10 टक्क्यांपेक्षा जागा रिक्त राहत असल्यास संबंधीत शिक्षकांना सीईओ कसे कार्यमुक्त करणार हा प्रश्न आहे.

जिल्हातंर्गतांचा जीव कासाविस

गेल्या महिनाभरापासून वेळपत्रक जाहीर करूनही आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लांबली आहे. यामुळे बदलीसाठी दोन वर्षापासून पात्र असूनही ताटकळलेल्या जिल्हातंर्गत शिक्षकांचा जीव आता कासाविस होत आहे. आंतरजिल्हावाल्यामुळे आमच्या बदल्या होत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होत आहे. यामुळे ग्रामविकास विभागाने तातडीने बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com