15 हजार 955 शेतकर्‍यांना 18 कोटी 36 लाखांचा विमा मंजूर

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची माहिती
15 हजार 955 शेतकर्‍यांना 18 कोटी 36 लाखांचा विमा मंजूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

फळबाग उत्पादकांसाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत योजनेत जिल्ह्यातील 15 हजार 955 शेतकर्‍यांना 18 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. याबाबतची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्टी तसेच दुष्काळ यामुळे फळबागांचे होणारे नुकसान विचारात घेऊन शेतकर्‍यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित विमा योजना सुरू केली आहे. या पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना राज्य व केंद्र सरकारही आपला हिस्सा अंतर्भूत करुन, या विमा योजनेचे संरक्षण देते. खरीप मृग बहार 2021-22 या वर्षात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पेरु, डाळींब, सीताफळ, लिंबू, संत्रा, चिक्कू या फळांचे उत्पादन घेण्यात येते. या उत्पादकांनी फळपिक विमा योजनेत सहभाग घेवून विम्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते.

जिल्ह्यातील 15 हजार 55 शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्ती, पाऊस, वादळी वारा यामुळे नुकसान झाल्यामुळे या विमा योजनेचा लाभ मिळाला असून या विमा रक्कमेपोटी 18 कोटी 36 लाख रुपयांचा विमा मंजुर झाला असल्याचे खा.डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे फळबागांच्या होणार्‍या नुकसानीपासून शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण व्हावे, यासाठी पुनर्रचित हवामान आधारीत फळबाग विमा योजना आणली आहे.

शेतकर्‍यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेतल्यावर शेतकरी हिश्याबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकारही यामध्ये शेतकर्‍यांच्या वतीने आपला हिस्सा टाकत असते. विमा योजनेत सहभाग घेतलेल्या फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना विमा रक्कम तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना या मंजुर विमा रक्कमेचा मोठा दिलासा मिळाला असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.

असा झाला विमा मंजूर

अकोले तालुक्यातील 881 शेतकर्‍यांसाठी 67 लाख 20 हजार, जामखेड तालुक्यातील 483 शेतकर्‍यांसाठी 47 लाख 39 हजार, कर्जत तालुक्यातील 844 शेतकर्‍यांसाठी 95 लाख 82 हजार, कोपरगाव तालुक्यातील 643 शेतकर्‍यांसठी 73 लाख 54 हजार, नगर तालुक्यातील 1336 शेतकर्‍यांसाठी 2 कोटी 77 लाख 61 हजार, नेवासा तालुक्यातील 84 शेतकर्‍यांसाठी 10 लाख 80 हजार, पारनेर तालुक्यातील 775 शेतकर्‍यांसाठी 94 लाख 50 हजार, पाथर्डी तालुक्यातील 1606 शेतकर्‍यांसाठी 1 कोटी 64 लाख 27 हजार, राहाता तालुक्यातील 2 हजार 80 शेतकर्‍यांसाठी 2 कोटी 4 लाख 10 हजार, राहुरी तालुक्यातील 618 शेतकर्‍यांसाठी 91 लाख 55 हजार, संगमनेर तालुक्यातील 4 हजार 362 शेतकर्‍यांसाठी 4 कोटी 59 लाख 35 हजार रुपये, शेवगाव तालुक्यातील 480 शेतकर्‍यांसाठी 53 लाख 47 हजार, श्रीगोंदा तालुक्यातील 1 हजार 587 शेतकर्‍यांसाठी 1 कोटी 83 लाख 6 हजार रुपये, तर श्रीरामपूर तालुक्यातील 176 शेतकर्‍यांसाठी 13 लाख 88 हजार रुपये असा जिल्ह्यातील 15 हजार 955 शेतकर्‍यांना 18 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांचा विमा झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com