
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
अतिवृष्टीने पिंपरी निर्मळ परिसरात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले.तालुक्यात दोनदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप पिके नष्ट झाली होती. शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रार केली. मात्र परतावे देतांना काहींना एकरी पाच हजार तर काहींना हजार रूपयांचा परतावा दिला आहे.
एकाच वेळी अतिवृष्टी झाली मात्र एकाच गावात वेगवेगळ्या रकमा देवुन विमा कंपनीने शेतकर्यांची थट्टा केली असून संबंधीत कंपनीवर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ यांनी केली आहे.
पिंपरी निर्मळ परीसरात सोयाबीन, बाजरी, मका आदी पिके सोगंणीस सुरवात झाली असतांना अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. पिक विमा भरणार्या शेतकर्यांनी ऑनलाईन तक्रार केल्यावर शेतकर्यांना एकरी हजार ते पाच हजाराचा परतावा देण्यात आला आहे. एकाच गावात एकाच वेळेस पाऊस झाला मात्र शेतकर्यांना वेगवेगळा परतावा रकम मिळाली.
त्यामुळे शेतकर्यांवर अन्याय झाला असून एका गावात तरी किमान सारखाच विमा परतावा मिळावा. यामध्ये महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालावे व विमा कंपनीच्या नफेखोरीला चाप लावून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जालिंदर निर्मळ यांनी केली आहे.
पीक विमा कंपनीकडे यंत्रणा नसल्याने या अतिवृष्टी काळात सर्वे करण्यासाठी खासगी माणसे नेमली होती. सर्वे करणे व कागदपत्र जमा करताना या लोकांनी शेतकर्यांकडुन पैसे जमा केले. ज्यांनी पैसे दिले त्यांचे नुकसानीची टक्केवारी जास्त टाकली व ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे नुकसानीची टक्केवारी कमी टाकली. त्यामुळे परताव्यांमध्ये तफावत आढळत असल्याची चर्चा आहे.