विमा कंपन्यांनो नियमानुसार शेतकर्‍यांचे पैसे द्या अन्यथा गुन्हा दाखल करणार - खा. लोखंडे

विमा कंपन्यांनो नियमानुसार शेतकर्‍यांचे पैसे द्या अन्यथा गुन्हा दाखल करणार - खा. लोखंडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांकडून विम्याची रक्कम दोन हजार घेतली आणि वाटप 500 ते 700 रुपये केले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासंदर्भात कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक सुरू आहे. जर कंपन्यांनी नियमानुसार शेतकर्‍यांना पैसे दिले नाही, तर खासदार म्हणून संबंधित विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची माझी जबाबदारी असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी पिकविमा, अतिवृष्टीमुळे फुटलेले बंधारे, रस्ते, नद्या-नाल्यावरील पुल, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, यासंदर्भात शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिकारी जगताप, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगळूरे, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, शिवसेना नेते कमलाकर कोते, विजय काळे, शिवाजी चौधरी, नाना बावके, बाळासाहेब पवार, बाजीराव दराडे, सुनिल कहाळे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुरेश डिके, बापूसाहेब शेरकर, सुधीर वायदंडे, नानक सावंत्रे, महेश देशमुख, संजय वाघचौरे, अण्णा म्हसे, सुरेश भिसे, रमेश काळे, दिनेश फटांगरे आदी शिवसेना पदाधिकार्‍यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार लोखंडे म्हणाले, उत्तर नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खेडेपाड्यातील बंधारे, रस्ते, त्याचप्रमाणे नदी नाल्यावरील पुल यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्या बंधार्‍यांची दुरुस्ती, फुटलेल्या रस्त्यांना निधी आणि नदी नाल्यावरील तुटलेले पुल आदी कामांसाठी सातही तालुक्यात आराखडा बनवून सदरचा आराखडा राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे पाठवणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा करून या सातही तालुक्यांना न्याय द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात जास्तीत जास्त पंचनामे करून नुकसान भरपाई तसेच विमा कंपनीने नुकसान भरपाईच्या 45 टक्के रक्कम तातडीने देण्यात यावी, असा आदेश खासदार लोखंडे यांनी अधिकार्‍यांना दिला असून विम्याच्या रकमेबाबत जाब विचारला. यावेळी विमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी उपस्थित शेतकर्‍यांनी केली. यावेळी खा. लोखंडे यांनी कृषी अधिकारी तसेच संबंधित विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना खडसावले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com