मुळा उजव्या कालव्याची जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पहाणी

मुळा उजव्या कालव्याची जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पहाणी

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील कौठा ते देडगाव लालगेट परिसरातील मुळा उजवा कालव्याचे भरावाची माती वारंवार घसरून पाणी वहनास अडथळा निर्माण होऊन कालव्याची वहन क्षमता कमी होत असल्याने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव व इतर अधिकाऱ्यांचे पथकाने गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन कौठा परिसरातील मुख्य कालव्याची पहाणी केली.

दि 29 सप्टेंबर रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी करून कौठा परिसरात वारंवार कालवा खचण्याचे प्रकाराकडे ना.पाटील यांचे लक्ष वेधले होते.त्याची दखल घेत तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

त्या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,अहमदनगर मुळा बंधारे विभागाच्या कार्यकारी सायली पाटील, तांत्रिक सल्लागार अमित बारटक्के, उपअभियंता बाळासाहेब भापकर, उपअभियंता प्रवीण दहातोंडे यांचे पथकाने गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी नेवासा तालुक्यातील कौठा परिसरात मुळा उजवा कालवा मैल 35 ते मैल 45 दरम्यान पहाणी केली.या परिसरात काळी-खलगट जमीन असल्याने कालव्याच्या दोन्ही बाजूच्या भरावासाठी वापरलेली माती वारंवार कालव्यामध्ये घसरते त्यामुळे कालव्यात मातीचे ढिगारे तयार होऊन पाणी वहनास आढथळा निर्माण होऊन पुढील भागाकडे पाहिजे त्या क्षमतेने पाणी प्रवाहित होत नाही आणि कालवा फुटण्याची शक्यता निर्माण होते.असे होत असल्याने लालगेट पासून सुरू होणाऱ्या ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँचवरील सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होत नाही, पर्यायाने आवर्तनाचा कालावधी वाढतो व पाणी वाया जाते. या कालव्याचे काम करण्याचे दृष्टीने जलसंपदा विभागाच्या पथकाने या कालव्याची पहाणी केली. लवकरच याबाबदचा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.