माणसांना जनावरांचे इंजेक्शन देऊन उपचार

खंडोबावाडीत बोगस डॉक्टर पकडला || गुन्हा दाखल
माणसांना जनावरांचे इंजेक्शन देऊन उपचार

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथे डॉक्टर असल्याचे सांगत एका व्यक्तीने गेल्या दोन दिवसापासून जनावरांचे औषध वापरून येथील 40 हून अधिक महिला व पुरूषांना पाठ गुडघा मानेला इंजेक्शन दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. या डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडून तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले.

सदाशिव जवंजळे (रा.आदेशपुरा, जिल्हा बीड) असे पकडण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. तिसगाव येथे या डॉक्टरांच्या बॅगेतील औषधांची खातर जमा झाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र सदाशिव जवंजळे हा डॉक्टर म्हणून या गावात आलेल्या व्यक्तीने मानेचे, गुडघ्याचे पाठीचे दुखणे ज्या लोकांना आहे त्यांना नेमकी दुखणार्‍या जागेवरच इंजेक्शन देऊन प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये उकळत होता. गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील लोकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत आहे. गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह आढळून आली.

डॉक्टर माणसाचे आहेत तर मग औषधांच्या बाटल्यावर जनावरांची चिन्ह कशी? अशी शंका गावातील तरुण राजू राठोड, शंकर जाधव, पंडित जाधव, अनिल जाधव, सुनील चव्हाण यांना आल्यानंतर त्यांनी करंजी येथील प्राथमिक उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी दिलीप तांदळे यांना बोलावून घेतले. त्यांनी देखील या सर्व औषधांची पाहणी केल्यानंतर या बोगस डॉक्टरला गावातील तरुणांच्या मदतीने तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

त्या ठिकाणी त्याच्याकडील सर्व औषधांची तपासणी व पाहणी केली असता जनावरांना जी औषध वापरली जातात त्याच औषधांचा प्रामुख्याने माणसांवर उपचार करण्यासाठी वापर करण्यात आला असल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीकडील औषधांचा पंचासमक्ष पंचनामा केल्यानंतर या व्यक्तीला पाथर्डी पोलीस स्टेशनला नेण्यात आले त्या ठिकाणी या बोगस डॉक्टरच्या विरोधात तिसगावचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून या बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

कमिशन घेणारा कोण ?

सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणार्‍या खंडोबावाडी येथे आलेल्या बोगस डॉक्टरला ज्या व्यक्तीने येथे बोलावून घेतले त्याला दररोज एक हजार रुपये कमिशन या डॉक्टरकडून दिले जायचे. अशी देखील माहिती पुढे आली असून हा कमिशन घेणारा व्यक्ती कोण हे देखील उघड होणे महत्त्वाचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com