‘सीएमआयएस’ अ‍ॅपमध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारांची कुंडली

‘सीएमआयएस’ अ‍ॅपमध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारांची कुंडली

पोलीस अधीक्षक पाटील : ‘टू-प्लस’मुळे गुन्हेगारीला आळा

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - जिल्ह्यात चार हजार 278 आरोपींचा ‘टू- प्लस’ या योजनेत समावेश करण्यात आला असून या सर्व आरोपींची क्राइम हिस्ट्री, गुंडा रजिस्टर, प्रतिबंधात्मक कारवाईसह त्यांच्या विरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगारांच्या माहितीसाठी ‘सीएमआयएस’ हे अ‍ॅप तयार केले असून यामध्ये गुन्हेगारांच्या कुंडल्या मांडण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात माला विषयक व शरीरविरोधात गुन्हे दाखल असलेल्या आरोपीविरोधात ‘टू-प्लस’ ही योजना राबविण्यात आली आहे. 2011 पासून आजतागायत ज्या ज्या गुन्हेगारांविरोधात दोन गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहे, अशा आरोपींविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ‘टू-प्लस’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यातून जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यात मोठा हातभार लागला आहे. हिट्रीशिट करताना मालाविषय गुन्हे करणार्‍या सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील 341 सराईत गुन्हेगारांचे हिट्रीशिट उघडण्यात आले असून जिल्हा अभिलेखावरील जुने 167 हिट्रीशिटर्स पैकी अक्रियाशिल 82 हिट्रीशिट कमी करण्यात आले आहे.

गुंडा रजिस्टर हे शरीरविषयक गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 517 गुंडांना गुंडा रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जिल्हा अभिलेखावर 900 गुंडांपैकी 209 गुंड हे गुंडा रजिस्टरमधून कमी करण्यात आले आहे. ‘टू-प्लस’ मधील गुन्हेगारांवर भादंवि कलम 110, 107 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार 422 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

‘टू-प्लस’ योजनेंतर्गत मालाविशेष गुन्हे करणार्‍यांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘सीएमआयएस’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून गुन्हेगारांचे नाव, पत्ता, नातेवाई, त्यावर असणारे गुन्हे, गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत, गुन्ह्यातील साक्षीदार यांची माहिती भरविण्यात आली आहे. सीएमआयएस अ‍ॅपद्वारे गुन्हेगारांना त्यांच्या राहत्या पत्त्यावर जावून चेक करण्याचे काम चालू असल्याने व त्यांचे लोकेशन टू प्लस योजनेंतर्गत सीएमआयएस अ‍ॅपमध्ये अपलोड होत असल्याने आरोपी हा नजरेआड न होता तो पोलिसांच्या नजरेसमोर येण्यास मदत होत असून यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

................

142 टोळ्या निष्पन्न

जिल्ह्यात आतापर्यंत गुन्हेगारांच्या 142 टोळ्या निष्पन्न झाल्या असून त्यातील चार टोळ्याविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये हद्दपार करण्यात आले आहे. तर कलम 56 नुसार 24 प्रस्ताव कारवाईसाठी प्रांतधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले आहे. एमपीडीए नुसार सहा प्रस्ताव प्राप्त झाले असून एका आरोपीला स्थानबद्ध करण्यात आले आहे. पाच प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आहे. मोक्का कायद्यातंर्गत सहा टोळ्यांवर कारवाई करण्यात आली असून तीन टोळ्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com