वयोवृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा - इंदुरीकर महाराज

वयोवृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा - इंदुरीकर महाराज

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

घर हे मंदिर आहे. घरातील आई-वडील देव-देवता आहेत. घरातील वयोवृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असा उपदेश समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केला.

राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र वडनेर येथे सालाबादप्रमाणे आश्विन वद्य त्रयोदशीच्या पर्वणीत संत बाळूमामा मंदिर प्रांगणात देशमुख महाराज यांचे कीर्तन झाले. त्याप्रसंगी महाराजांनी बाळूमामांचे चरित्र सांगून घरातील वृद्धांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. घरातील आई वडिलांना मुलांप्रमाणे सांभाळा. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तर तुम्ही या ठिकाणी आहात. महामारीत वाचले म्हणून तुमचा पुनर्जन्म म्हणावा लागेल, मदतीपेक्षा आधार द्या, हसत समाधानाने जगा, तरुण वर्गाने कष्टाने कामवा, पर्यावरणाचा समतोल राखा, मन खंबीर ठेवा, आजार होणार नाही. असा उपदेश महाराजांनी केला.

करोना महामारीत असंख्य तरुण मृत्युमुखी पडले आहेत. विधवा स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्या, भावजय आई समान असते. त्यांच्या लहान मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक द्या, खातेवाटपात त्यांना झुकते माप द्या, गावागावातील शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे तेथे गवत वाढले. पत्त्यांचे अड्डे सुरू झाले, एवढेच नव्हे तर दारूचे अड्डेही सुरू झाले आहेत. ग्रामस्थांनी शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन द्यावे. करोना महामारीमुळे कलाकारांचा र्‍हास होत चालला आहे. कलाकारांनी संस्कृती जपून ठेवली आहे. कलाकारांना शासनाने मदत केली नाही. परंतु समाजाने कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन निवृत्ती महाराज देशमुख यांनी केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com