विज्ञानाला अध्यात्माची जोड द्या

अन्यथा भावी पिढीचे भवितव्य अंधाकारमय - इंदुरीकर
विज्ञानाला अध्यात्माची जोड द्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली गेली नाही तर भावी पीढीचे भवितव्य अंधाकारमय राहिल हा अंधकार रोखण्यासाठी सुसंस्कारित पीढी घडविणे गरजेचे आहे त्याकरिता शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दररोज हरिपाठ देणे महत्वाचा आहे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांनी केले आहे.

साईनिर्माण उद्योग समूहाच्य वतीने समाज प्रबोधनकार निवृत्तीनाथ महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्रम शिर्डी येथील साई किमया लॉन्स येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साई निर्माण उद्योगसमूहाचे अध्यक्ष विजय कोते, साई निर्माण शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष ताराचंद कोते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिर्डीचे माजी कैलासबापू कोते व साईनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय कोते तसेच साई निर्माण शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष ताराचंद कोते यांच्या हस्ते हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा सन्मान करण्यात आला.

या किर्तनाप्रसंगी प्रबोधन करतांंना इंदुरीकर महाराज म्हणाले की, करोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. आजची पिढी मोबाईलच्या आहारी गेल्याने त्यांना भविष्यात अनेक विकारांना सामोरे जावे लागेल. आगामी काळ नेत्ररोग तज्ञ, कानाचे व मनोरुग्ण यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांसाठी माल छापणारा राहील. संस्कराअभावी आजची मुले अल्पवयातच गुन्हेगारी कृत्याकडे वळताहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. यापासून पिढी वाचविण्यासाठी घरात हरिनाम पाठ व आध्यात्मिक संस्कार होणे गरजेचे आहे.

बदलत्या काळात काही रूढी व परंपरा बदलणे महत्वपुर्ण आहे. आपण पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट करतो. लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. परंतु अंत्ययात्रेत आपण चिल्लर अर्थात पैसा उधळतो हे चुकीचे आहे. अंत्ययात्रेत चिल्लर उधळण्याऐवजी या चिल्लरचा पैशाचा वापर गोरगरीब गरजू मुलांना चॉकलेट व खाद्यपदार्थ देण्यासाठी करावा, त्यांना हे पदार्थ दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर फुलणारे हसू तुम्हाला प्रचंड समाधान व खूप आशीर्वाद देणारे ठरेल.

एक व्यक्ती एक झाड संकल्पना राबत गावोगाव वृक्षांची लागवड करा. लग्न समारंभात सत्कार समारंभाच्या होणारा अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करा. श्रीमंतांना मदत करण्याऐवजी कोरोनात उद्ध्वस्त झालेल्या कुटूंबियांना मदत करा असा उपदेश समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी यावेळी दिला. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com