मी खरं बोलतो म्हणून मला दररोज त्रास दिला जातो

मी खरं बोलतो म्हणून मला दररोज त्रास दिला जातो

कोल्हार | वार्ताहर

जगात असंख्य समस्या प्रश्न आहेत. मात्र त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स (Video Clips) बनवल्या जात नाहीत. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या दररोज व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात. (Indurikar Maharaj video)

त्या क्लिप्समध्ये माझ्या वाक्यांची मोडतोड करून वादग्रस्त विधान म्हणून लोकांसमोर आणल्या जातात. मी प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात? असा सवाल निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Indurikar Maharaj) यांनी केला.

कोल्हार भगवतीपूर (Kolhar bhagwatipur) येथे श्री भगवतीदेवी मंदिराच्या (Bhagwatidevi temple) प्रांगणात महाशिवरात्र महोत्सव समितीच्यावतीने काल बुधवारी समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. यावेळी आपल्या सुश्राव्य कीर्तनात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

इंदोरीकर महाराज म्हणाले, भुंग्याला जशी मकरंदाची गोडी लागते, तशी आपल्याला भजनाची गोडी लागली पाहिजे. जीवनात पैसा पैसा कामी येत नाही. पैशाची घमेंड करू नका. आपल्याला पुण्यकर्मच कामी येतात, माणसाचं मन मोठं आणि हृदय निर्मळ असावे. हृदय निर्मळ करण्यासाठी भगवंताचे भजन करावं. शरीर शुद्ध नसले तरी चालेल पण चित्त शुद्ध असले पाहिजे. आपण एवढे सुशिक्षित आहोत मग आपल्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का आहेत? शेतकऱ्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात नाहीत. ज्यांना लाखो रुपये पगार आहे, त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात का दिसतात? ज्या महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे. छत्रपतींनी स्वराज्य स्थापना केली, तिथे वृद्धाश्रम कशाला हवेत ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष सयाजी खर्डे, विश्वस्त प्रभाकर खर्डे, भाऊसाहेब खर्डे, प्रकाश खर्डे, श्रीकांत खर्डे तसेच धनंजय दळे, रावसाहेब कमळाजी खर्डे, बापूसाहेब कडसकर, साहेबराव दळे, वसंतराव मोरे, ऋषिकेश खांदे, विजय डेंगळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले. कीर्तनाच्या सांगतानंतर महाशिवरात्र दिनी महिलांकरिता आयोजित रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हार भगवतीपूर महाशिवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय मोरे, मंगेश वादे, अक्षय वादे, आदित्य चव्हाण, वैभव कोळपकर, युवराज जंगम, गणेश गोसावी, दिनेश राकेचा, आयुष मोरे, कौशल दळवी, यश जोशी, सुजित खळदकर, आशुतोष बोरसे आदी प्रयत्नशील होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com