‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर इंदुरीकर महाराज, म्हणाले...

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर इंदुरीकर महाराज, म्हणाले...

करंजी | वार्ताहर | Karanji

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा डाव सुरू असून किर्तनरुपी सेवेतून खरं बोलणं व समाजापुढे वर्तमान काळातली वस्तुस्थिती मांडणे माझ्यासारख्या प्रबोधनकाराला आता चांगलेच महागात पडत असून मला कोणी कितीही बदनाम करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरी देखील समाज घडविण्यासाठी व धर्मकार्य पुढे नेण्यासाठी माझे समाज प्रबोधन कार्य सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केली आहे.

नगर तालुक्यातील जाब कौडगाव येथे श्री संत बाळूमामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण या त्रीदिंनी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता या सोहळ्याची सांगता इंदोरीकर महाराज यांचे कीर्तनाने झाली.

यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले श्री संत बाळूमामा, जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी समाज घडवणसाठी आपले जीवन वेचले. सध्याच्या युगात गोड बोलून स्वार्थ साधणाऱ्याची संख्या वाढली आहे. मी माझ्या किर्तन सेवेतून वर्तमानकाळ याविषयावर खरं बोलून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे. अनवधानाने एखादा शब्द चुकून माझ्या वाणीतून गेला तर तोच धागा पकडून मला सोशल मीडियावर बदनाम करण्याचे काम केले जाते. दोन तासाच्या कीर्तनात मी चांगलं बोललेलं सोशल मीडियावर येत नाही याची खंत व्यक्त करत इंदुरीकर महाराजांनी तरुणांना विशेष कानमंत्र देत व्यसनापासून दूर रहा, गाव प्लास्टिक मुक्त करा, दररोज वृत्तपत्राचे वाचन करा, आणि गावात वाचनालय सुरु करण्याचे आवाहन केले.

व्यसनाचे प्रमाण वाढले आणि उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले यामुळे तरुण वेगळ्या वळणाकडे वळला आहे. देवाच्या मंदिरा इतकेच ज्ञानाच्या मंदिराला महत्त्व द्या तरच देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करु शकतो असे म्हणत मी लस घेतली नाही घेणार नाही असं म्हणालो परंतु इतरांनी लस घेऊ नये असे मी कुठेही म्हटले नाही. अनावधानाने एखादा शब्द चुकून वाणीतून जातो तोच धागा पकडून टीआरपी वाढवण्यासाठी मला लक्ष केले जात असल्याची खंत इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली. यावेळी संयोजकांच्या वतीने कोरोना योध्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन बाळूमामा देवालयाच्या वतीने करण्यात आले होते.

तुमच्या पाया पडतो कॅमेरे बंद करा...

जाबकौडगाव येथे कीर्तनासाठी व्यासपीठावर आलेले इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरू करण्यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच उपस्थित जनसमुदायाच्या हातातील मोबाईल, स्क्रीनवर दिसत असलेला जनसमुदाय लक्षात येताच इंदुरीकर महाराज व्यासपीठाच्या खाली उतरून थेट स्क्रीनवाल्या ऑपरेटरजवळ जाऊन व इलेक्ट्रॉनिक मीडिया व मोबाईलवाले यांना हात जोडून तुमच्या पाया पडतो कॅमेरे आणि मोबाइल बंद करा म्हटल्यानंतर सगळ्यांनीच कॅमेरे बंद केले आणि त्यानंतर कीर्तन सुरू झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com