‘इंद्रधनुष्य- 2022’ विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यासपीठ- ना. विखे पाटील

‘इंद्रधनुष्य- 2022’ विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यासपीठ- ना. विखे पाटील

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

इंद्रधनुष्य-2022 या महोत्सवाच्या व्यासपीठामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वतःचे कलागुण दाखविण्याची संधी मिळते. तसेच स्वतःमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यासपीठ मिळते, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, येथे ‘इंद्रधनुष्य-2022’ या आंतरविद्यापीठ युवक महोत्सवाचे उद्घाटन ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 9 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. यावेळी रायगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. प्रदीप इंगोले, दत्तात्रय उगले, तुषार पवार, दत्तात्रय पानसरे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, डॉ. बापूसाहेब भाकरे, मिलिंद ढोके आदी उपस्थित होते. ना. विखे पाटील म्हणाले, कृषि विद्यापीठांनी जगातील पहिल्या पन्नासमध्ये असणार्‍या विद्यापीठांशी सामंजस्य करार करावेत. कृषि क्षेत्रातील सर्व महत्वाच्या स्टार्टअपमधून उर्जा देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. यातील तंत्रज्ञान लोकांनी स्वीकारले पाहिजे. तुमचे, तुमच्या कुटुंबाचे व समाजाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून ते पुर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपली पूर्ण ताकद लावून निश्चित केलेले ध्येय कठोर परिश्रम करुन साध्य करा. राहुरी कृषि विद्यापीठाने संपूर्ण देशामध्ये जास्त बियाणे तयार करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याचबरोबर देशामधील पहिले ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. देशी गाय संवर्धनाचा प्रकल्प पुणे येथे सुरू झालेला असून असून वेगवेगळ्या देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत.

चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे म्हणाले, आपले ध्येय सुरुवातीलाच निश्चित करा व ते पुर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करा. तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, आनंदात जगा व आपल्या मस्तीत रहा. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही करत असलेली मेहनतच तुम्हाला यशापर्यंत घेवून जाईल. जो स्वतःला ओळखतो तोच जगात यशस्वी होतो असा कानमंत्र त्यांनी दिला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. डॉ. प्रमोद रसाळ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रमोद पाब्रेकर यांनी इंद्रधनुष्य स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. कारभारी काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

इंद्रधनुष्य-2022 या माहितीपुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी कवितेच्या स्वरुपात आभार मानले. सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील 21 विद्यापीठांमधील 800 पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झालेले आहेत.

पाच दिवस चालणार्‍या या युवक महोत्सवात हे विद्यार्थी वेगवेगळ्या 28 इव्हेंटद्वारे त्यांचा कलाविष्कार सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, अ‍ॅड. सुभाष पाटील, कृषिभूषण सुरसिंग पवार, रावसाहेब तनपुरे तसेच राजभवनातील डॉ. गोविंद कतलाकुटे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. वाणी लातुरकर, डॉ. विठ्ठलराव नाईक व डॉ. चितोडे तसेच डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे व डॉ. साताप्पा खरबडे हे अधिकारी उपस्थित होते.

हवामान खात्यावर विद्यापीठाचा विश्वास नाही का ?

राज्यातून पाऊस जाऊन आठ दिवस झाले. त्यामुळे पावसाची शक्यता नसून थंडी सुरू झाल्याचे जवळपास सर्वच शासकीय हवामान खात्यांनी जाहीर केले आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने लाखो रूपये खर्च करून वाटरप्रुफ मंडप का टाकला? व जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशी होते? याची चर्चा उपस्थितांमध्ये असताना हा वाह्यात खर्च नियोजन करणार्‍या आधिकार्‍यांकडून वसूल करावा, तसेच शासकीय हवामान खात्यावर राहुरी कृषि विद्यापीठाचा विश्वास नाही का? असा उपस्थितांमधून सवाल केला जात होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com