खरं बोलतो म्हणून लोक माझ्या मागे लागतात - इंदोरीकर महाराज

खरं बोलतो म्हणून लोक माझ्या मागे लागतात - इंदोरीकर महाराज

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

आपणाला भविष्यात कुठं तरी सत्य पचवावं लागणार, मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्या मागे लागतात, दोन तीन महिन्यांने असंही म्हणतील की इंदोरीकर महाराजांची नार्को चाचणी करा, असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी किर्तनात भाविकांना उपदेश करताना केले.

माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे अनिल औताडे यांनी आयोजित केलेल्या इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाविकांना उपदेश करताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, मी सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्यामागे कोण कोणती झंजट लावील सांगता येत नाही. मी खरं बोलतो म्हणून लोक माझ्यामागे लागतात. परंतू न डगमगता या कर्माची फळे मी भोगतो. डोक्यावरून नुसते काळेकुट्ट ढग वाहुन, वीज किती कडाडली त्याला महत्व नाही. परंतू काळेकुट्ट ढगातून पाणी पडत असताना वीज कडाडत असेल तर सहन करायला काय हरकत आहे.

सोशल मिडीयावरील स्वत:च्या बदनामीच्या क्लिपबाबत खेद व्यक्त करत महाराज म्हणाले की, शेतकर्‍यांच्या व्यथा, वास्तव न दाखविता चुकीच्या पध्दतीने मांडल्या जातात. आपल्या परिसरातील सहकारी साखर कारखान्याने जर 2200 रुपये भाव जाहीर केल्यावर मिडीयाला दिवसभर पट्टी चालते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 3150 रुपये भाव जाहीर करूनही कुठेही पट्टी अथवा ऊहापोह होत नाही. शेतकरी संघटनचे कार्यकर्ते अनिल औताडे यांनी या कार्यक्रमास भरपूर खर्च करून उत्कृष्ट नियोजन केले. परंतू हेच क्लिपवाले उद्या म्हणतील की, ही फेब्रुवारीतील तयारी आहे, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.

आम्ही इंदोरीकर महाराजांच्या पाठिशी - पाटील

इंदोरीकर महाराज स्पष्टोक्ते असून समाजातील वास्तव समोर मांडतात. त्यांच्या बोलण्यावर काहींनी आक्षेप घेतले. मात्र आम्ही त्यांच्या विचाराबरोबर आहोत. इंदोरीकर महाराज शेतकर्‍यांच्या व्यथा मांडतात. बाबु गेणू यांनी आयात धोरणाविरोधात 12 डिसेंबरला आहुती दिली. शरद जोशी यांनीही अखेरचा श्वास याच दिवशी घेतला. म्हणून 12 डिसेंबर दोघांचेही स्मृतीदिन आम्ही एकत्रित साजरे करत असतो. यावर्षी 12 डिसेंबरच्या स्मृतीदिन सोहळ्यास इंदोरीकर महाराज यांना यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी आमंत्रण दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com