इंदोरीकर महाराजांचे निवासस्थान ठरतेय भाविकांसाठी सेल्फी पॉईंट

इंदोरीकर महाराजांचे निवासस्थान ठरतेय भाविकांसाठी सेल्फी पॉईंट

रहिमपूर |वार्ताहर| Rahimpur

अवघ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेरील तरुण तरुणींना व आबालवृद्धांना आपल्या गावरान नगरी भाषेत व विनोदी ढंगात परमार्थाचे वेड लावणार्‍या समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील निवासस्थान सध्या येथे येणार्‍या भाविकांसाठी ‘सेल्फी पॉइंट’ ठरले आहे.

संगमनेर-अकोल्याचे सुपुत्र निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर गेल्या वीस, पंचवीस वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द या गावी राहतात. महाराजांची जन्मभूमी अकोले तालुक्यातील इंदोरी असली तरी कर्मभूमी संगमनेर तालुका आहे. संगमनेर पासून नऊ-दहा किलोमीटर वर असणार्‍या रहिमपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर ओझर खुर्द या गावी अगदी रोडच्या कडेला निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे टुमदार व देखणे असे ‘संत कृपा’ नावाने दुमजली निवासस्थान आहे. या निवासस्थानात निवृत्ती महाराज देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नी हभप. शालिनीताई देशमुख, मुलगा कृष्णा महाराज देशमुख आणि कन्या ज्ञानेश्वरी असे सर्वजण राहतात.

या निवासस्थानाची रचनाच येणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. गतवर्षी या नवीन वास्तूत इंदोरीकर महाराज वास्तव्याला आले. यापूर्वी ते या नवीन निवासस्थानापासून जवळच असणार्‍या जुन्या ठिकाणी राहत होते. मात्र तेथे जागा कमी पडू लागल्याने महाराजांनी या नवीन निवासस्थानाची उभारणी केली आहे. या निवासस्थानात भला मोठा हॉल असून याठिकाणी दररोज सकाळी राज्यभरातून आणि राज्याबाहेरून लोक महाराजांची किर्तनाची तारीख घेण्यासाठी येत असतात. त्याठिकाणी बसून इंदोरीकर महाराज आलेल्या लोकांशी अगदी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधतात. याच हॉलमध्ये महाराजांना मिळालेल्या स्मृतिचिन्हासाठी वेगळे शोकेश बनवले आहे.

यामध्ये शेकडो स्मृतिचिन्हे येणार्‍या प्रत्येकाचे डोळे दिपवून टाकतात. या निवासस्थानाच्या बाहेर प्रशस्त अशी पार्किंग व्यवस्था आहे. राज्यभरातून आलेल्या लोकांसाठी व त्यांच्या वाहनांसाठी ही सोय केली आहे. महाराजांना भेटून झाल्यावर यातील प्रत्येक जणाला महाराजांच्या निवासस्थानाची छबी आपल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद करावीशी वाटते. त्यामुळे प्रत्येक जण येथे आल्यावर महाराजांच्या सोबत फोटो सेशन झाल्यावर या संत कृपा नावाच्या निवासस्थानाचा सेल्फी घेतल्याशिवाय जात नाही. चित्रपट सृष्टीत अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईस्थित जलसा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याजवळ उभे राहून अनेक जण सेल्फी काढतात. त्याचप्रमाणे वारकरी संप्रादयातील सर्वात मोठे ‘सेलिब्रिटी’ असणार्‍या इंदोरीकर महाराज यांच्या संत कृपा नावाच्या निवासस्थानाचा सेल्फी घेण्यासाठी येथे येणार्‍या प्रत्येकाचीच चढाओढ सुरू असते.

गेल्या अनेक वर्षांपासून इंदोरीकर महाराज वारकरी संप्रदयात महत्त्वपूर्ण काम करत आहेत. वीस पंचवीस वर्षांपूर्वी वारकरी संप्रदयातील किर्तनाकडे पाठ फिरवलेला तरुण वर्ग महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो. त्यामुळे त्यांच्या किर्तनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नगरी भाषेत आणि आपल्या गावराण विनोदाने समाजात सुरू असणार्‍या घडामोडींवर ते भाष्य करत असतात. त्यामुळे इंदोरीकर महाराजांचे नाव राज्यात नव्हे देशात गाजते आहे. साधी राहणी आणि लोकांना रुचेल व पटेल असे विचार त्यांच्या अंगी आहेत. त्यांच्या निवासस्थानी येणार्‍या प्रत्येकाला त्यांच्या निवासस्थाना सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे महाराजांचे संत कृपा हे निवासस्थान येथे येणार्‍या प्रत्येकासाठी सेल्फी पॉईंट ठरत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com